
शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीचे वेळापत्रक जाहीर
औरंगाबाद - ग्रामविकास विभागाच्या निर्णयानुसार यंदा शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया ऑनलाइन पार पडणार आहे. तांत्रिक अडचणींमुळे बदलीसाठी विलंब झाला आहे. आता आंतरजिल्हा बदल्यांचे वेळापत्रक अंतिम झाले असून, २ ते १३ ऑगस्ट या काळात बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या आंतरजिल्हा व जिल्ह्याअंतर्गत बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होत असल्याचे ग्रामविकास विभागाच्या निदर्शनास आले होते. याबाबत अनेक पात्र शिक्षकांनी ग्रामविकासकडे तक्रारी देखील केल्या होत्या. शिक्षकांच्या तक्रारीनंतर ग्रामविकास विभागाने ७ एप्रिल २०२१ रोजी बदली प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला. मेअखेर पूर्ण होणारी प्रक्रिया अजूनही सुरू झालेली नाही. शाळा सुरू होण्यापूर्वी बदली झालेले शिक्षक नवीन शाळेवर रुजू व्हायचे. पण, ऑनलाइन प्रक्रियेत सुरवातीपासून तांत्रिक अडचणी आल्याने बदल्या होऊ शकल्या नव्हत्या. आता शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदली प्रक्रियेचे वेळापत्रक सोमवारी ग्रामविकास विभागाचे उपसचिव के. जी. वळवी यांनी जाहीर केले आहे. बदलीसाठी पात्र शिक्षकांनी त्या संकेतस्थळावर माहिती भरली आहे. त्यानुसार दोन व तीन ऑगस्टदरम्यान शिक्षकांचे रोस्टर त्यावर अपलोड केले जाणार आहे. त्यामुळे शिक्षक बदलीचा तीन महिन्यांपासून प्रलंबित राहिलेला विषय आता मार्गी लागण्याची शक्यता आहे.
अडथळा आल्यास लांबणार प्रक्रिया
शाळा सुरू होऊन दीड महिना होऊन गेला आहे. अद्याप बदलीपात्र शिक्षक त्याच शाळेवर आहेत. बदली न झालेल्या शिक्षकांना आता नवीन शाळांचे वेध लागले आहेत. त्यांना बदलीसाठी अर्ज करायला केवळ चार दिवसांची मुदत दिली आहे. शनिवार (ता.सहा) ते मंगळवार (ता.नऊ) या कालावधीत त्यांना बदलीसाठी अर्ज करावे लागणार आहेत. राज्यातील तब्बल एक लाखांहून अधिक शिक्षक, तर औरंगाबाद जिल्ह्यातील अडीच हजाराहून अधिक शिक्षक बदलीसाठी पात्र आहेत. मात्र, अर्ज केल्यानंतर तांत्रिक अडथळा निर्माण झाल्यास काही दिवस पुन्हा बदली प्रक्रिया लांबणीवर पडण्याचीही शक्यता नाकारता येत नाही, असेही ग्रामविकास विभागातील सूत्रांनी सांगितले.
असे आहे वेळापत्रक...
४ ते ५ ऑगस्ट - बिंदुनामावली प्रसिद्ध
६ ते ९ ऑगस्ट - आंतरजिल्हा बदली अर्ज
१० ते १२ ऑगस्ट - बदलीची कार्यवाही
१३ ऑगस्ट - बदलीचे आदेश
Web Title: Teachers Of Inter District Transfer Schedule Announced
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..