TET Scam | राज्य परिषदेच्या कामकाजाला ‘टीईटी’ घोटाळ्याचा फटका | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

राज्य परिषदेच्या कामकाजाला ‘टीईटी’ घोटाळ्याचा फटका

राज्य परिषदेच्या कामकाजाला ‘टीईटी’ घोटाळ्याचा फटका

औरंगाबाद : ‘टीईटी’ घोटाळ्यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला आहे. परिणामी, परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणाऱ्या एनटीएस, एमएमएस, एचएसएस, सीईटी, जीसीसी आदी परीक्षा रखडल्या आहेत, तर घेतलेल्या काही परीक्षांचे निकाल अद्याप प्रलंबित आहेत. त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीवर आहे.

परीक्षा परिषदेमार्फत डीटीएड, एमएसएस, एचएसएस, राष्ट्रीय प्रज्ञाशोध, एनएमएमएस, जीसीसी, सीईटी, टीईटी, संगणक टायपिंग अशा दहा ते बारा परीक्षा घेतल्या जातात. दरवर्षी घेण्यात येणाऱ्या विविध परीक्षा मागील चार महिन्यांपासून रखडल्या आहेत. तसेच आठ महिन्यांपूर्वी घेतलेल्या परीक्षेचे निकाल अद्याप जाहीर करण्यात आलेले नाहीत. याचा परिणाम शालेय विद्यार्थ्‍यांसोबतच नोकरीची वाट पाहणाऱ्या लाखो तरुणांच्या भविष्यावर होत आहे.

टीईटीचा निकाल रखडल्याने भावी शिक्षक चिंतेत आहेत; तर अभियोग्यता चाचणी झाली नसल्याने भरती प्रक्रियेबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे. माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षा अध्याप झालीच नाही. वर्षातून दोन वेळा घेण्यात येत असलेली व्यावसायिक शिक्षण आणि नोकरीसाठी लागणाऱ्या वाणिज्य प्रमाणपत्र (जीसीसी) परीक्षेवर देखील परिणाम झाला आहे. जीसीसीची पहिल्या परीक्षेचा निकाल बाकी आहे; तर दुसऱ्या परीक्षेची तारीख होऊन गेली तरी अद्याप घेण्यात आलेली नाही. टायपिंग परीक्षा, आरआयएमसी १०, सेवा प्रवेशोत्तर विभागीय परीक्षा ज्या लिपिक, पर्यवेक्षक व सहायक शिक्षण उपनिरीक्षक संवर्गांसाठी असतात, त्या परीक्षेचे निकाल पुढची परीक्षा कधी होणार? याची विद्यार्थी वाट पाहत आहेत.

याबाबत परीक्षा परिषदेतील अधिकाऱ्याने सांगितले की, राष्ट्रीय प्रज्ञा शोध परीक्षेची (एनटीएस) तारीख अद्याप केंद्राकडून मिळालेली नाही. राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षा घेण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेची तयारी सुरू आहे. दरपत्रकाबाबत यासाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. वाणिज्य प्रमाणपत्र (जीसीसी) ही वर्षातून दोनवेळा घेण्यात येते. या परीक्षेचे ज्या संस्थेने काम पूर्ण केले, त्यांच्याकडून निकाल मागविण्यात आले आहेत. त्यामुळे लवकरच निकाल जाहीर होईल. संगणक आणि टायपिंगच्या परीक्षा निकालाबाबतचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला असून, निकालाची तारीख लवकरच कळविली जाईल. तसेच पाचवी आणि आठवीची शिष्यवृत्तीची परीक्षा ऑगस्टमध्ये घेण्याचे नियोजन आहे.

शिष्यवृत्ती परीक्षा ऑगस्टमध्ये शक्य

इयत्ता पाचवी आणि आठवीसाठी घेण्यात येणाऱ्या शिष्यवृत्ती परीक्षेची तारीख २० फेब्रुवारी जाहीर केली होती. परंतु, ही तारीख पुढे ढकलून सुधारित वेळापत्रक नंतर जाहीर केले जाईल, अशी परीक्षा परिषदेने कळविले होते. मात्र, अद्याप परीक्षेबाबत काहीच कळविण्यात आलेले नाही. आता ही परीक्षा ऑगस्टमध्ये घेतली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Tet Scam Hit State Council Functioning Nmms Pending

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top