औरंगाबाद : शहरात लवकरच धावणार ३५ मिडी इलेक्ट्रिक बस | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इलेक्‍ट्रिक बस

औरंगाबाद : शहरात लवकरच धावणार ३५ मिडी इलेक्ट्रिक बस

औरंगाबाद - एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला तरी बंद असलेली शहर बससेवा सुरू करण्यासाठी औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने खासगी एजन्सीकडून मनुष्यबळ घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार निविदा प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात १० कंत्राटदारांनी प्रतिसाद दिला असून, यातील सहा जण तांत्रिकदृष्ट्या पात्र ठरले आहेत. यापैकी एका एजन्सीची नियुक्ती करून जूनपासून स्मार्ट बस पूर्ण क्षमतेने सुरू करण्याचा निश्‍चय महापालिकेचे प्रशासक तथा स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी केला आहे. लवकरच शहरातील रस्त्यावर ३५ मिडी इलेक्ट्रिक बस धावतील, असे त्यांनी नमूद केले.

औरंगाबाद स्मार्ट सिटीतर्फे तीन वर्षांपूर्वी १०० बस खरेदी करण्यात आल्या आहेत. या बस चालविण्यासाठी आवश्‍यक मनुष्यबळ एसटी महामंडळाकडून घेण्यात आले होते. पण एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत संप केल्यानंतर शहर बसही बंद पडली. संप मिटण्याचे चिन्ह नसल्याने औरंगाबाद स्मार्ट सिटीचे सीईओ आस्तिककुमार पांडेय यांनी काही माजी सैनिकांची बसचालक आणि वाहक म्हणून नियुक्ती केली. त्यामुळे १७ स्मार्ट बस सुरू झाल्या. उर्वरित बस सुरू करण्यासाठी खासगी एजन्सीकडून मनुष्यबळ घेतले जाणार आहे. त्यानुसार निविदा काढण्यात आली होती. त्यात १० एजन्सींनी प्रतिसाद दिला. या निविदांची तांत्रिक तपासणी केली असता, सहा एजन्सींच्या निविदा पात्र ठरल्या.

फायनान्शियल बिड सोमवारी (ता. दोन) उघडले जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर एका आठवड्याच्या कालावधीत पात्र एजन्सीला कार्यारंभ आदेश दिले जातील. त्यानंतर ३० दिवसांचा कालावधी कंत्राटादाराला देण्यात येईल. एक जूनपासून पूर्ण क्षमतेने बस रस्त्यावर धावताना दिसतील, असे प्रशासनाने कळविले आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाच्या रेस टू रेसिलीयन्स, महाराष्ट्र शासनाच्या रेस टू झिरो उपक्रमांत सहभाग नोंदवत स्मार्ट सिटीने शहरात लवकरच ३५ मिडी सिंगल डेकर इलेक्ट्रिक बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. १९ मेपर्यंत निविदा दाखल करण्याची मुदत आहे. २० मेला ही निविदा उघडली जाणार आहे.

Web Title: Thirty Five Midi Electric Bus Run In Aurangabad City Soon

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top