esakal | औरंगाबादेत वाळू माफियांच्या पाठलागाचा थरार, मात्र आरोपी पसार | Aurangabad Crime News
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद : वाळू माफियांच्या पाठलागाचा थरार

औरंगाबादेत वाळू माफियांच्या पाठलागाचा थरार, मात्र आरोपी पसार

sakal_logo
By
अनिल जमधडे

औरंगाबाद : वाळू माफियांच्या पाळतीवर असलेल्या तहसीलच्या पथकाला वाळू माफियांनी गुंगारा देण्याचा प्रयत्न केला. दुपारी तीनपासून सुरु असलेला ‘खेळ’ रात्री अकरापर्यंत म्हणजे तब्बल आठ तास सुरू होता. रात्री उशिरा पोलिसांच्या मदतीने हायवा जप्त करण्यात यश आले. मात्र, चालक आणि कारवाई टाळण्यासाठी आलेले वाळूमाफिया अखेर पसार झाले.अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी अप्पर तहसीलदार विजय चव्हाण, नायब तहसीलदार प्रशांत देवडे, तलाठी संजय पवार, दिलीप बिरारे, रोहिदास चव्हाण, दिलीप जाधव, एल. के. गाडेकर आणि सुरक्षारक्षकांसह दोन जीप घेऊन पथक शनिवारी (ता. ९) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास गस्तीवर होते. सोलापूर-धुळे महामार्गावरून पथकाची गस्त सुरू असताना वाळूची बेकायदा वाहतूक करणारा हायवा (क्र. एम एच २० ई एल ९० ३६) भरधाव शहराकडे येत होता. तहसीलच्या पथकाने वाळूच्या हायवाचा पाठलाग सुरू केला. महानुभाव चौकात जीप आडवी लावून हायवा थांबविण्यात पथकाला यश आले.

हेही वाचा: सामान्यांच्या ताटातून भाजी गायब

त्यानंतर हायवा जप्त करून तहसीलकडे नेण्यासाठी पथकातील एका कर्मचाऱ्याला हायवासोबत बसविण्यात आले. हायवापुढे एक जीप, मध्ये हायवा आणि पाठीमागे एक जीप असा हा ताफा तहसीलच्या दिशेने निघाला. रेल्वे स्टेशनला वळसा घालून बाबा पेट्रोलपंप चौकाकडे निघाल्यानंतर उड्डाणपुलाच्या जवळच रस्त्याच्या कडेला प्रचंड दलदल दिसताच हायवाचालकाने काही कळण्याच्या आत दलदलीमध्ये हायवा फसवला. त्यानंतर चालकाने केलेल्या फोनाफोनीमुळे वाळूमाफियांचे दहा ते पंधरा जण घटनास्थळी दाखल झाले. तहसीलच्या पथकाला अरेरावी करून कारवाई थांबविण्यासाठी प्रयत्न झाला. मात्र, महसूल विभागाचे पथक कारवाईवर ठाम होते. त्यांनी पोलिसांना फोन केले; परंतु बंदोबस्तात व्यस्त असलेले पोलीस पोचण्यास उशीर झाला.

दुपारी चारपासून फसलेल्या ट्रकला बाहेर काढण्यासाठी दोन जेसीबी बोलाविण्यात आले. ही कारवाई सुरू असताना रात्री आठच्या सुमारास छावणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद इंगळे व त्यांचे सहकारी तसेच वेदांत नगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक कैलास जाधव आणि त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांची मोठी कुमक दाखल होताच वाळूमाफियांनी पळ काढला. चालकासह त्याला सोडविण्यासाठी आलेले सर्व जण पसार झाले. त्यानंतर रात्री उशिरा म्हणजे जवळपास साडेअकरापर्यंत ट्रक बाहेर काढण्याची कारवाई पूर्ण झाली. ट्रक बाहेर काढल्यानंतर तो जप्त करण्यात येणार आहे आणि योग्य ती कारवाई केली जाईल, असे अप्पर तहसीलदार विजय चव्हाण यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले.

loading image
go to top