टोयोटाची ऑक्टोबरमध्ये ३० हजार ३६० वाहनांची विक्री
जानेवारी ते ऑक्टोबरदरम्यान तीन टक्के वाढ, देशांतर्गत बाजारात २ लाख ९९ हजार वाहनांची विक्री
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. २ : टोयोटा किर्लोस्कर मोटरने ऑक्टोबर २०२६ मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत २९ हजार ५२१ वाहनांची विक्री केली असून, ८३९ वाहनांची निर्यात केली आहे. कंपनीची महिनाभरातील एकूण विक्री ३० हजार ३६० वाहनांवर पोचली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सणासुदीच्या काळात ग्राहकांकडून मिळालेल्या प्रतिसादामुळे कंपनीच्या विक्रीला चालना मिळाली आहे. राष्ट्रीय कामगिरी सोबतच कंपनीच्या बिडकीन येथील प्रकल्पाच्या कामगिरीकडेही लक्ष लागले आहे.
जानेवारी ते ऑक्टोबर २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत टोयोटाने एकूण तीन लाख २५ हजार २७४ वाहनांची विक्री केली. मागील वर्षी याच कालावधीत तीन लाख १५ हजार ७१६ वाहनांची विक्री झाली होती. त्यामुळे एकूण विक्रीत तीन टक्के वाढ नोंदविण्यात आली आहे. या कालावधीत देशांतर्गत बाजारपेठेतील विक्री दोन लाख ८७ हजार ३३८ वरून दोन लाख ९९ हजार १४० वाहनांवर पोचली. त्यात चार टक्के वाढ झाली. दुसरीकडे, निर्यातीत आठ टक्के घट झाली असून, २०२५ मधील २८ हजार ३७८ वाहनांच्या तुलनेत यंदा २६ हजार १३४ वाहनांची निर्यात झाली.
उत्पादन क्षमता ३.३१ लाख वाहनांची
टोयोटा किर्लोस्कर मोटरमध्ये टोयोटा मोटर कॉर्पोरेशनचा ८९ टक्के, तर विक्रमगीत इन्व्हेस्टमेंट्स अँड होल्डिंग्जचा ११ टक्के हिस्सा आहे. कंपनीत ६ हजार ८४६ कर्मचारी कार्यरत असून, उत्पादनासाठी सुमारे ४३२ एकर क्षेत्राचा वापर केला जातो. कंपनीची वार्षिक स्थापित उत्पादन क्षमता तीन लाख ३१ हजार २०० वाहनांची आहे.
------
सणासुदीच्या काळात विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांचा उत्साह कायम असून, टोयोटाच्या उत्पादनांवरील आणि सेवांवरील विश्वासातून सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्यासाठी विविध उत्पादन पर्याय आणि ग्राहकाभिमुख उपक्रमांवर कंपनीचा भर आहे. नव्याने सादर केलेल्या टोयोटा ग्लान्झालाही ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.
-सबरी मनोहर, कार्यकारी उपाध्यक्ष (विक्री, सेवा), टोयोटा किर्लोस्कर मोटर्स