धावत्या मालगाडीपासून
तीन डबे झाले विलग!
--
गोकुंदा फाटकावर वाहतूक ठप्प
----
गोकुंदा (जि.नांदेड), ता. २० (बातमीदार) : किनवट रेल्वेस्थानकातून नांदेडच्या दिशेने कोळसा भरून निघालेल्या मालगाडीच्या गार्ड बोगीसह शेवटचे तीन डबे अचानक विलग झाल्याची घटना रविवारी (ता. २०) दुपारी एकच्या सुमारास घडली. डबे वेगळे झाल्याचे लक्षात येताच मालगाडी थांबवून ‘रिव्हर्स’ घेण्यात आली. त्यानंतर विलग झालेले डबे जोडून मालगाडी मार्गस्थ झाली.
डबे पुन्हा जोडण्याच्या प्रक्रियेला अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ लागल्याने गोकुंदा (ता. किनवट) रेल्वे फाटकावर वाहनांच्या लांब रांगा लागल्या. दोन्ही बाजूंनी वाहतूक खोळंबली. वाहनधारकांना फाटक उघडण्याची बराच वेळ प्रतीक्षा करावी लागली.
काही दिवसांपूर्वीच टळला होता अनर्थ
--
काही दिवसांपूर्वीच किनवटहून नांदेडकडे जाणारी नंदीग्राम एक्स्प्रेस जोडणी नसलेल्या रुळाच्या दिशेने गेल्याचा प्रकार घडला होता. लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य दुर्घटना टळली होती. त्यानंतर आता धावत्या मालगाडीचे डबे विलग झाल्याने किनवट स्थानकासह परिसरातील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.
---
स्थानकातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
--
किनवट रेल्वे स्थानकावर यापूर्वी मालगाडीला आग लागण्याची घटना तसेच नंदीग्राम एक्स्प्रेसच्या रुळासंबंधीचा प्रकार चर्चेत आला होता. त्यामुळे ट्रॅक, पॉइंट्स, सिग्नल यंत्रणा, डब्यांची जोडणी आणि रेल्वे मार्गाच्या देखभाल-दुरुस्तीची सखोल तपासणी करण्याची मागणी प्रवाशांकडून होत आहे. मोठी दुर्घटना घडण्यापूर्वी रेल्वे प्रशासनाने संभाव्य त्रुटी दूर करून सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
----
((कोट))
--
धावत्या मालगाडीच्या गार्ड बोगीसह शेवटचे दोन ते तीन डबे विलग झाले होते. मालगाडी मागे घेऊन संबंधित डबे पुन्हा जोडण्यात आले. जोडणी पूर्ण झाल्यानंतर मालगाडी मार्गस्थ करण्यात आली. या प्रक्रियेमुळे काही काळ रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.
- हे राम, स्टेशन मास्तर