सात ग्रामपंचायतींच्या विकासकामांची मागविली माहिती
----
खासदार आष्टीकरांचे जिल्हा परिषदेला पत्र
----
वानोळा, ता. १९ (बातमीदार) : माहूर तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या विकासकामांमध्ये पारदर्शकता यावी आणि निधीच्या वापराबाबतच्या तक्रारींची वस्तुस्थिती स्पष्ट व्हावी, यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी तालुक्यातील सात ग्रामपंचायतींच्या मागील पाच वर्षांतील विकासकामांची माहिती मागविली. यासंदर्भात त्यांनी १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जिल्हा परिषद, नांदेडच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे.
माहिती मागविलेल्या ग्रामपंचायतींमध्ये अंजनखेड, गोंडवडसा, सेलू करंजी, शेकापूर, सिंदखेड, पारडी आणि हारडफ यांचा समावेश आहे. या ग्रामपंचायतींमध्ये मागील पाच वर्षांत विविध योजनांतर्गत मंजूर झालेल्या विकासकामांची अंदाजपत्रके, करारपत्रे, मोजमाप पुस्तिका आणि देयकांचा तपशील उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. मंजूर निधी, प्रत्यक्ष झालेली कामे आणि खर्च यांची कागदपत्रांच्या आधारे पडताळणी झाल्यास विकासकामांची वस्तुस्थिती स्पष्ट होण्यास मदत होणार आहे.
----
‘पायलट सेतू’ प्रकल्पाची संकल्पना
दरम्यान, माहूर तालुक्यातील मच्छिंद्र पारडी येथील रहिवासी व नागरी सेवा अभ्यासक गौरव संजय राठोड यांनी विकासकामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी ‘पायलट सेतू’ प्रकल्पाची संकल्पना मांडली आहे. या माध्यमातून विकासकामांची प्रत्यक्ष स्थळपाहणी करून छायाचित्रे, व्हिडिओ आणि उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे वस्तुनिष्ठ अहवाल तयार करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला आहे. हा उपक्रम निःस्वार्थ भावनेतून आणि शून्य खर्चात राबविण्याची तयारी दर्शवत, पाहणीचा अहवाल खासदार कार्यालयापर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी देण्याची विनंती त्यांनी केली आहे.
----
प्रशासनाच्या कार्यवाहीकडे लक्ष
खासदारांनी मागविलेली माहिती कधी उपलब्ध होते आणि जिल्हा परिषद प्रशासनाकडून कोणती कार्यवाही केली जाते, याकडे संबंधित गावांतील नागरिकांचे लक्ष लागले आहे. मात्र, संबंधित ग्रामपंचायतींमध्ये गैरव्यवहार झाल्याचे अद्याप सिद्ध झालेले नाही. त्यामुळे कागदपत्रांची पडताळणी आणि अधिकृत चौकशीनंतरच अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.