तुळजापूरसाठी एसटीच्या १०५० बस
---
तुळजाभवानीमातेच्या अश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त नियोजन
--
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. ५ : तुळजाभवानी देवीच्या अश्विनी पौर्णिमा यात्रेनिमित्त तुळजापूरला जाणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी राज्य परिवहन (एसटी) महामंडळाने कंबर कसली आहे. यात्रा काळात भाविकांची ने-आण करण्यासाठी राज्यातील विविध विभागांतून १ हजार ५० बसची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये मराठवाड्यातून ६५०, तर पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सोलापूर विभागातून ४०० बस २५ ते २७ ऑक्टोबरदरम्यान तुळजापूरसाठी व तेथून त्या-त्या शहरांत धावणार आहेत.
विभागनिहाय सोडण्यात येणाऱ्या बस
--
(महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी विविध भागांतून येणाऱ्या बसचे आगार व विभागनिहाय वर्गीकरण केले आहे.)
--
विभाग -- बससंख्या -- पार्किंग
--
- पुणे -- ३५० -- मंगरूळ रोड
- बीड -- १७५ -- मुक्तांगण शाळा, धाराशिव रोड
- धाराशिव -- १५० -- मुक्तांगण शाळा
- लातूर -- १२५ -- काक्रंबा बायपास चौकाजवळ
- परभणी -- १०० -- मुक्तांगण शाळा
- सोलापूर ५० -- मुक्तांगण शाळा
- कर्नाटक राज्य -- १०० -- तुळजापूर आगार
सोयी-सुविधा
--
विविध विभागांतून येणाऱ्या गाड्यांमुळे शहरात वाहतूक कोंडी होऊ नये, यासाठी महामंडळाच्या धाराशिव विभागाने तुळजापूर आगार, मुक्तांगण शाळा (धाराशिव रोड), मंगरूळ रोड आणि काक्रंबा बायपास चौक अशा चार प्रमुख ठिकाणी पार्किंगची आखणी केली आहे. परिसरात वीज, ध्वनिक्षेपक यंत्रणा, पिण्याचे पाणी, मोबाइल टॉयलेटची व्यवस्था करण्यात येणार आहे.
मराठी, कन्नड भाषेत माहिती फलक
--
कर्नाटक तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येणाऱ्या भाविकांना बसच्या वेळा व थांब्यांची अचूक माहिती मिळावी, यासाठी मराठी व कन्नड भाषेत विशेष डिजिटल फलक उभारले जाणार आहेत. हे फलक तुळजाभवानी प्रवेशद्वार, तुळजापूर मुख्य बसस्थानक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि मलबा हॉस्पिटल या प्रमुख ठिकाणी लावण्यात येतील.