मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत तुषार
देशमुखांनी मांडले विद्यार्थ्यांचे प्रश्न
-------------------
हदगाव, ता.१४ (बातमीदार) : एमपीएससी व इतर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रश्न, पेपरफुटी, लघुलेखक पदभरती, ७५ हजार मेगा भरती, पोलिस भरती तसेच विविध विभागांतील पदभरतीच्या अडचणींवर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबर रोजी मुंबई येथील ‘वर्षा’ निवासस्थानी विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी, शिक्षक व निवडक युवकांची बैठक झाली. राज्यभरातून निवडलेल्या २९ युवक आणि शिक्षक प्रतिनिधींमध्ये नांदेडचे युवा विद्यार्थी असोसिएशन महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तुषार देशमुख यांचा समावेश होता.
या बैठकीत देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांसमोर ११ मिनिटे विद्यार्थ्यांचे विविध प्रश्न मांडले. एमपीएससी परीक्षांतील अनियमितता व पेपरफुटी, लघुलेखक संवर्ग, ७५ हजार मेगा भरती, पोलिस भरती, अन्न व औषध प्रशासन, कृषी विभागातील पदभरती, सरळसेवा भरती तसेच विद्यार्थ्यांची आंदोलने, मोर्चे व उपोषणांबाबत त्यांनी भूमिका मांडली. विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांसाठी तुषार देशमुख हे सातत्याने आंदोलन व शासनाकडे पाठपुरावा करत आहेत. लघुलेखक संवर्ग मृत घोषित करण्याच्या शासन निर्णयाविरोधातील आंदोलन, शिक्षक भरती आणि स्पर्धा परीक्षांतील प्रश्नांवर त्यांनी शासनाचे लक्ष वेधले आहे. नांदेडचा आवाज आता थेट मंत्रालयापासून मुख्यमंत्र्यांच्या बैठकीपर्यंत पोहोचला. ही संधी नांदेडच्या विद्यार्थ्यांचा सन्मान आहे, अशी प्रतिक्रिया तुषार देशमुख यांनी दिली. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी युवा विद्यार्थी असोसिएशनचा लढा यापुढेही सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.