
औरंगाबाद : शहरातील दोन लाख नागरिक पहिल्या डोसपासून दूरच
औरंगाबाद : कोरोना संसर्गाची तिसरी लाट ओसरल्यानंतर लसीकरणाचा प्रतिसाद पुन्हा एकदा कमी झाला आहे. अद्याप शहरातील दोन लाख १९ हजार ५२४ नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला नसल्याचे समोर आले आहे. ११ लाख ७१ हजार ७१५ लसीकरणाचे महापालिकेला उद्दिष्ट होते पण नऊ लाख ५२ हजार १९१ जणांनीच पहिला डोस घेतला आहे. पवित्र रमजान महिना व उन्हाच्या तीव्रतेमुळे संध्याकाळी देखील लसीकरण सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.
कोरोना संसर्गाची लाट सुरू होताच नागरिक प्रतिबंधक लस घेण्यासाठी स्वतः होऊन समोर येतात. मात्र लाट ओसरताच गर्दी कमी होते. त्यामुळे शहराच्या लसीकरणाची टक्केवारी अद्याप ८१ पर्यंतच आहे. मुंबईत लसीकरणाचे १०० टक्के उद्दिष्ट पूर्ण झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे. पण औरंगाबाद शहर खूप मागे आहे. विशेष म्हणजे चार लाख ६४ हजार ६५९ नागरिकांची दुसऱ्या डोसची तारीख निघून गेली तर सुमारे दोन लाख १९ हजार ५२४ नागरिकांनी अद्याप पहिलाच डोस घेतलेला नाही. १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचे ६९ हजार ९१८ एवढे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. पण २६ हजार ७७७ जणांनीच लस घेतली. १२ ते १४ वयोगटातील ४६ हजार मुलांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. पण सहा एप्रिलपर्यंत केवळ चार हजार ७४८ लहान मुलांनी लस घेतली आहे, असे महापालिकेचे आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेच्या यांनी सांगितले. दरम्यान रमजान महिना व उन्हाच्या तीव्रतेमुळे सायंकाळी देखील काही लसीकरण केंद्र सुरू ठेवले जाणार आहेत.
दुकानांमध्ये असेल सोय
बाजारपेठत काही मोठ्या दुकानांमध्ये देखील लसीकरणाची सोय करण्यासंदर्भात विचार सुरू आहे. तसेच लसीकरणाचे प्रमाण वाढावे यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू असून, विविध ठिकाणी बैठका घेण्यात आल्या. धर्मगुरूंमार्फत नागरिकांना आवाहन करण्यात आले, असे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.
Web Title: Two Lakh Citizens In The City Are Far From First Dose Of Covid Vaccine Aurangabad
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..