
छत्रपती संभाजीनगर : वादळी वाऱ्यात सिद्धार्थ उद्यानाच्या प्रवेशद्वाराच्या डोमची भिंत कोसळून दोन महिलांचा मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर व चार ते पाच जण किरकोळ जखमी झाल्याची घटना बुधवारी (ता. ११) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली. ‘बीओटी’ (बांधा, वापरा, हस्तांतरित करा) कंत्राटदाराने डोमच्या भिंतीचे केलेले काम निकृष्ट असल्याने दुरुस्तीसाठी महापालिकेने आठ महिन्यांपूर्वी पत्र दिले होते. मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने दोघांचा नाहक बळी गेला. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांची मदत महापालिकेने जाहीर केली आहे. या घटनेची समितीमार्फत चौकशी करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला आहे.