घोषणांचा हिशेब मागणार ः पाटील
१७ सप्टेंबर यूबीटीचे ‘तुमसे ना हो पायेगा’ आंदोलन
धाराशिव, ता. ५ (बातमीदार) : मराठवाड्याच्या विकासासाठी सरकारने अनेक घोषणा केल्या; मात्र त्यांची अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे या घोषणांची सरकारला आठवण करून देण्यासाठी तसेच योजनांचा लाभ सर्वसामान्यांना कितपत मिळाला, याचा हिशेब विचारण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने १७ सप्टेंबरला छत्रपती संभाजीनगर येथे ‘तुमसे ना हो पायेगा’ हे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी शनिवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली.
आमदार प्रवीण स्वामी, जिल्हा सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, संजय निंबाळकर, रवी वाघमारे यांची यावेळी उपस्थिती होती. आमदार घाडगे पाटील म्हणाले, की मराठवाड्यात यंदा पावसाची सुमारे ६० टक्के तूट आहे. पिकांची स्थिती गंभीर असतानाही अद्याप पंचनाम्याचे आदेश देण्यात आलेले नाहीत. दुष्काळ जाहीर करण्याकडेही सरकारचे दुर्लक्ष आहे. शेतकऱ्यांना उपलब्ध पाणी मिळण्यासाठी किमान आठ तास पुरेशा दाबाने वीजपुरवठा करावा, तसेच पिकांचे पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आहे.
मराठवाड्याला हक्काचे पाणी देण्यासाठी २२ वर्षांपूर्वी घोषणा झालेल्या कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पाचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. सुरवातीला चार हजार ७०० कोटी रुपये अपेक्षित असलेल्या या प्रकल्पाची किंमत आता १२ हजार कोटींवर पोहोचली आहे. निधी वेळेत व पुरेसा न मिळाल्याने प्रकल्पाची किंमत वाढत गेली. त्यामुळे या प्रकल्पाच्या कामाबाबत सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
सांगली, कोल्हापूरच्या पुराचे पाणी मराठवाड्यात आणण्याच्या प्रकल्पाचा आराखडा अद्याप पूर्ण झालेला नाही. तसेच धाराशिव जिल्ह्यातील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याच्या मागणीकडेही दुर्लक्ष होत आहे. पिकविमा, रोजगार, एमआयडीसी, टेक्सटाईल पार्क आणि लॉजिस्टिक पार्कच्या प्रश्नांवरही सरकारला घेरले जाणार आहे.
दरम्यान, सात सप्टेंबरला तहसील कार्यालयांना निवेदन देण्यात येणार असून, आठ सप्टेंबरला धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
........................................
((चौकट))
उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करा
मकरंद राजेनिंबाळकर यांनी धाराशिव येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या उपकेंद्राचे विद्यापीठात रूपांतर करण्याची मागणी केली. आमदार प्रवीण स्वामी यांनीही मराठवाड्यावर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करीत, विकासाच्या रखडलेल्या योजनांचा जाब विचारण्यासाठी आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगितले.