विलासराव देशमुख अभय योजनेचा पावणेतीन लाख वीजग्राहकांना लाभ

कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या ग्राहकांना दिलासा
Vilasrao Deshmukh Abhay Yojana
Vilasrao Deshmukh Abhay Yojana sakal

औरंगाबाद : कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित असलेल्या ग्राहकांकडील थकबाकी वसुलीसाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ‘विलासराव देशमुख अभय योजना’ जाहीर केलेली आहे. औरंगाबाद परिमंडलात अशा ग्राहकांची संख्या सुमारे पावणेतीन लाख असून या योजनेमुळे त्यांच्याकडील सुमारे ५६१ कोटी रुपयांच्या थकीत वीजबिलाच्या वसुलीला गती मिळणार आहे.

योजनेचा कालावधी १ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२२ पर्यंत असून ही योजना कृषी ग्राहक वगळून सर्व वर्गवारीतील ग्राहकांना लागू आहे. ३१ डिसेंबर २०२१ पूर्वी कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित ग्राहकांना योजनेचा लाभ घेता येईल. योजनेत ग्राहकांनी थकबाकीची मूळ रक्कम एकरकमी भरली तर त्यांच्या थकबाकीवरील व्याज व विलंब आकार १०० टक्के माफ करण्यात येणार आहे. या योजनेत सुलभ हप्त्याने रक्कम भरावयाची सुविधा आहे. मात्र त्यासाठी मुद्दलाच्या ३० टक्के रक्कम एकरकमी भरणे अत्यावश्यक आहे. ग्राहकांना उर्वरित रक्कम सहा हप्त्यात भरता येईल.

महावितरणने थकबाकीच्या रक्कम वसुलीसाठी कोर्टात दावा दाखल केला असेल व ग्राहकांना योजनेतील सवलतीचा लाभ घ्यावयाचा असेल तर अशा ग्राहकांनी महावितरणला दाव्याचा खर्च (न्यायालयीन प्रक्रिया खर्च) देणे अत्यावश्यक राहील. योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना महावितरणच्या ऑनलाइन पोर्टलवर नोंदणी करावी लागणार आहे.

अशी आहे परिस्थिती

औरंगाबाद परिमंडलात म्हणजे औरंगाबाद व जालना जिल्ह्यात डिसेंबर-२०२१ अखेर कायमस्वरूपी वीजपुरवठा खंडित झालेल्या थकबाकीदार ग्राहकांची संख्या दोन लाख ७३ हजार ८३२ एवढी आहे. त्यांच्याकडे ५६१ कोटी ४ लाख रुपयांची थकबाकी आहे. यात औरंगाबाद शहर मंडलात ४२ हजार ४४९ ग्राहकांकडे २२९.८२ कोटी, औरंगाबाद ग्रामीण मंडलात १ लाख ३ हजार २५७ ग्राहकांकडे ११६.६९ कोटी तर जालना मंडलात १ लाख २८ हजार १२६ ग्राहकांकडे २१४.५३ कोटींची थकबाकी आहे. या योजनेचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com