जिल्ह्यात जल सातबारा उपक्रमाला गती
---------
-गावनिहाय जलसाठ्यांची डिजिटल नोंद; पाणीटंचाई नियोजनासाठी उपयुक्त
सकाळ वृत्तसेवा
परभणी, ता. २२ ः ग्रामीण भागातील संभाव्य पाणीटंचाईवर नियंत्रण मिळविण्यासह उपलब्ध जलसंपत्तीचे प्रभावी व्यवस्थापन करण्यासाठी राज्य शासनातर्फे ‘पाण्याचा सातबारा’ अर्थात जल सातबारा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या माध्यमातून गावातील पाण्याची उपलब्धता, वापर, पुनर्भरण, शिल्लक साठा यांची डिजिटल स्वरूपात नोंद ठेवली जाणार आहे. त्यामुळे वर्षभराच्या पाणी नियोजनाला दिशा मिळणार असून, दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे.
शेतजमिनीची मालकी, क्षेत्रफळ, पिकांची माहिती सातबारा उताऱ्यातून मिळते. त्याच धर्तीवर गावातील जलसंपत्तीची सविस्तर माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याची संकल्पना जल सातबारा उपक्रमातून पुढे आली आहे. यात भूजलाची स्थिती, पृष्ठभागावरील जलसाठे, पुनर्भरण, वर्षभरासाठी उपलब्ध राहू शकणाऱ्या पाण्याचा अंदाज नोंदविला जाणार आहे. जल सातबारा तयार करताना गावातील विहिरी, कूपनलिका, तलाव, बंधारे यांची संख्या व पाणी साठविण्याची क्षमता यांचा तपशील गोळा केला जाणार आहे. यासोबतच पावसाळ्यानंतरची भूजल पातळी, उपलब्ध पाणीसाठा, विविध कारणांसाठी होणारा पाणीवापर, जलपुनर्भरण, उर्वरित साठ्याची माहिती संकलित केली जाईल. या आकडेवारीच्या आधारे गावाची पाण्याची गरज आणि उपलब्ध स्रोत यांचा तुलनात्मक आढावा घेता येणार आहे. जिल्ह्यातील निवडक गावांत जल सातबारा तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील जलस्रोतांची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून त्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर प्रशासनाचा भर आहे. संकलित माहिती विशेष ॲप आणि पोर्टलवर डिजिटल पद्धतीने नोंदविण्यात येणार असल्याने जलसंपत्तीचा तपशील जतन करणे आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करणे सुलभ होणार आहे. जलसाठ्यांच्या स्थितीचा अचूक अंदाज मिळावा, यासाठी पावसाळ्यानंतर, हिवाळ्यानंतर, उन्हाळ्याच्या अखेरीस अशा तीन टप्प्यांत जलसंपत्तीचे परीक्षण केले जाणार आहे. या प्रक्रियेमुळे वर्षभरातील पाणीसाठ्यात होणारे बदल लक्षात येतील. कोणत्या भागात पाण्याची मागणी अधिक आहे, कुठे जलसाठा कमी पडण्याची शक्यता आहे, पुनर्भरणासाठी कोणत्या उपाययोजना आवश्यक आहेत, याचे नियोजन करणे शक्य होणार आहे.
---
उन्हाळ्यात उपक्रमाचे महत्त्व
कमी, अनियमित पावसामुळे जिल्ह्यातील काही भागांत पाणीटंचाईची चिंता वाढली आहे. अनेक गावांत विहिरी, कूपनलिकांमधील पातळी घटत असल्याने आगामी उन्हाळ्यात पाणीपुरवठ्याचे आव्हान अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करणे, जलस्रोतांचे योग्य व्यवस्थापन करणे आवश्यक ठरणार आहे. जल सातबारामुळे गावनिहाय पाण्याचा डिजिटल ताळेबंद तयार होऊन उपलब्धता, गरज यांचा मेळ घालण्यास मदत होईल. त्यातून पाणीवापरावर नियंत्रण, जलपुनर्भरणाच्या उपाययोजनांना प्राधान्य, संभाव्य टंचाईग्रस्त भागांसाठी पूर्वनियोजन करणे शक्य होणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणी व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध करण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरू शकतो.
--------------