टॅंकरच्या फेऱ्या वाढल्या
- जिल्ह्यात २८६ विहिरींचे अधिग्रहण
- नऊ गावे, वाड्यांवर १२ टँकर सुरू
सकाळ वृत्तसेवा
धाराशिव, ता. १९ : अनेक भागांत आता पाणीटंचाईची समस्या डोके वर काढू लागली आहे. सध्या ९ गावे व वाड्यांवर १२ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, तर प्रशासनाकडून २८६ खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे.
जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईची तीव्रता काही ठिकाणी जाणवू लागली असून, प्रशासनाच्या वतीने तत्काळ टँकरची व्यवस्था करण्यात येत आहे. त्यानुसार धाराशिव तालुक्यात सर्वाधिक ५ गावांसाठी ७ टँकर सुरू आहेत. यात पळसप येथे सर्वाधिक ३, कौडगाव (बावी), करजखेडा, बोरखेडा आणि नांदुर्गा येथे प्रत्येकी १ टँकरद्वारे पाणीपुरवठा होत आहे. याशिवाय उमरगा तालुक्यातील नारंगवाडी येथे २, तर बलसूर आणि आनंदनगर येथे प्रत्येकी १, असे एकूण चार टँकर सुरू आहेत. तसेच लोहारा तालुक्यातील सास्तूर येथे एक टँकर सुरू आहे. दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे अद्याप तुळजापूर, कळंब, भूम, वाशी आणि परांडा या पाच तालुक्यांत सध्या टँकरची गरज भासलेली नाही. मात्र, या तालुक्यांतदेखील लवकरच टॅंकरची गरज भासेल, अशी स्थिती आहे.
........
((चौकट))
२८६ विहिरींचे अधिग्रहण
टँकरवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी आणि स्थानिक पातळीवरच पाण्याचा स्रोत उपलब्ध व्हावा, यासाठी प्रशासनाने खासगी विहिरींच्या अधिग्रहणावर भर दिला आहे. संपूर्ण जिल्ह्यात एकूण २८६ खासगी विहिरी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. यामध्ये नऊ विंधन विहिरी टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी वापरल्या जात आहेत. २७७ विहिरी या टँकरव्यतिरिक्त (स्थानिक पातळीवरील विहिरींवरून) पाणीपुरवठा करण्यासाठी अधिग्रहित करण्यात आल्या आहेत. पाणीटंचाईची सर्वाधिक झळ ग्रामीण भागातील महिला, वृद्ध आणि बालकांना सोसावी लागते. डोक्यावर हंडा घेऊन दूरवर जाणाऱ्या महिलांचा त्रास कमी व्हावा, यासाठी गावातच विहिरींचे अधिग्रहण आणि टँकरची सोय केल्यामुळे ग्रामस्थांचा त्रास काहीसा कमी होण्यास मदत होणार आहे. प्रशासनाकडून ग्रामीण भागातील पिण्याच्या पाण्याला सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून, पाण्याचे वितरण सुरळीत ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
.......
((चौकट))
काटकसरीने वापर करण्याचे आवाहन
प्रशासन आपल्या स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करत असले, तरी आगामी काळातील भीषणता टाळण्यासाठी जलस्रोतांचे संरक्षण करणे काळाची गरज बनली आहे. पाण्याच्या उपलब्ध साठ्यांचे योग्य नियोजन, काटकसरीने होणारा वापर आणि पाण्याचा अपव्यय टाळणे यावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. प्रशासनाच्या या उपाययोजनांसोबतच नागरिकांनीही पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.