औरंगाबाद शहरात नागरिकांची पाण्यासाठी एकच ओरड... पाणी द्या पाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

water Shortage

औरंगाबाद शहरात नागरिकांची पाण्यासाठी ओरड... पाणी द्या पाणी

औरंगाबाद - शहरातील पाणीप्रश्‍न सोडविताना महापालिका अधिकाऱ्यांच्या घशालाही कोरड पडली आहे. सोमवारी (ता. नऊ) सकाळी तासाभरात तीन शिष्टमंडळांनी प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांची भेट घेऊन आम्हाला पाणी कधी मिळणार असा सवाल केला? शिष्टमंडळातील नागरिकांची समजूत काढताना प्रशासकांच्या नाकीनऊ आले. उन्हाळा सुरू झाल्यापासून शहरात पाण्याविना नागरिकांचे हाल सुरू आहेत. अनेक भागात आठ-नऊ दिवसाला नळाला पाणी येत असल्याने नागरिक रस्त्यावर येऊन आंदोलने करत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता शिवसेनेच्या शिष्टमंडळाने श्री. पांडेय यांची भेट घेतली. त्यानंतर हनुमान टेकडी परिसरातील नागरिकांचे शिष्टमंडळ आले.

शिष्टमंडळातील नागरिकांनी आम्हाला जानेवारी महिन्यापासून पाणी टंचाईचा त्रास होत आहे. बेकायदा नळांची संख्या वाढली आहे. त्यामुळे बेकायदा नळांवर कारवाई करण्यात यावी. रात्री-अपरात्री पाणी येते, वेळा बदलण्यात याव्यात, अशी मागणी केली. त्यावर श्री. पांडेय यांच्याकडून समाधानकारक उत्तरे मिळत नसल्याने नागरिक संतप्त झाले. आम्ही हक्काचे पाणीही मागू शकत नाही का? अशा भावना नागरिकांनी व्यक्त केल्या. शिष्टमंडळाचे नेतृत्व माजी नगरसेवक सचिन खैरे, गणू पांडे, प्रतिभा जगताप यांनी केले. त्यानंतर माजी सभापती दिलीप थोरात यांच्या नेतृत्वाखालील उल्कानगरी भागातील नागरिकांनी प्रशासकांची भेट घेतली. दीड महिन्यापासून या भागातील नागरिक त्रस्त आहेत. विश्‍वभारती कॉलनी येथील टाकी भरत नसल्यामुळे अडचण असल्याचे नागरिकांचे म्हणणे होते. समांतर बंद करताना तुम्ही कुठे होते? समांतर पाणी पुरवठा योजना रद्द झाली, त्यावेळी नागरिकांनी योजना रद्द करण्यास विरोध केला पाहिजे होता. त्यावेळी तुम्ही कुठे होतात? असा प्रश्‍न प्रशासकांनी शिष्टमंडळातील नागरिकांना केला. दोन वर्षांत तुम्हांला पहिल्यांदाच पाहत आहोत, असे प्रा. उमाकांत राठोड म्हणाले. त्यावर प्रशासकांनी विषय पाण्याचा आहे, त्यावरच बोला. मी दररोज कार्यालयात असतो, असे नमूद केले.

Web Title: Water Shortage In Aurgangabad City

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top