सणासुदीत ‘नळांनाही उपवास’
-----
-पाणीपुरवठा सक्षम करण्यासाठी आणखी २४ तासांचा शटडाऊन
-नवरात्रात जलसंकट ः दुरुस्तीसह नव्या योजनेतील जलकुंभांना जोडणी
---
सकाळ वृत्तसेवा
छत्रपती संभाजीनगर, ता. ११ : शहराचा पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि सुरळीत करण्यासाठी महापालिकेने मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन जलयोजनेतील जलकुंभांना जोडणी करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामांसाठी सोमवारी (ता. १२) सकाळी आठपासून मंगळवारी (ता. १३) सकाळी आठपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद राहील. या २४ तासांच्या शटडाऊननंतर पाणीपुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्यासाठी एक ते दोन दिवस लागण्याची शक्यता पाणीपुरवठा विभागाने वर्तवली आहे.
जुन्या शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी असलेल्या १,४०० मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन योजनेतील ७०० मिमी जलवाहिनीच्या क्रॉस कनेक्शनसाठी ९ ऑक्टोबरला सकाळी सातपासून शटडाऊन घेण्यात आला होता. तो १० ऑक्टोबरला सकाळी सातपर्यंत अपेक्षित असताना प्रत्यक्षात ३० तास चालला. त्यानंतर आता पुन्हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात येत आहे. मात्र, हा शटडाऊन पाणीपुरवठा अधिक सक्षम करण्यासाठी आवश्यक आहे. मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्ती आणि नवीन जलयोजनेतील जलकुंभांना जोडणी देण्यासाठी सोमवारी सकाळी आठपासून मंगळवारी सकाळी आठपर्यंत शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या कालावधीत मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यासह नवीन पाणीपुरवठा योजनेतील विविध जोडणीची कामे हाती घेण्यात येतील. तथापि, यापूर्वीच्या ३० तासांच्या शटडाऊनमुळे शहराचा पाणीपुरवठा आधीच विस्कळित झालेला असताना, पुन्हा शटडाऊन घेतल्यामुळे नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागणार आहे.
---
(((कोट)))
शटडाऊन संपल्यानंतर पाणीपुरवठा पूर्णपणे सुरळीत होण्यासाठी एक ते दोन दिवस लागू शकतात. त्यामुळे नागरिकांनी आवश्यक पाणीसाठा करून ठेवावा आणि पाण्याचा काटकसरीने वापर करावा. जोडणीची कामे पूर्ण झाल्यानंतर टप्प्याटप्प्याने पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याने काही भागांत पाणी उशिराने मिळण्याची शक्यता आहे.
डी.पी. गायकवाड, कार्यकारी अभियंता, पाणीपुरवठा विभाग
----
जोडणी आणि दुरुस्तीची कामे अशी
१. मुख्य जलवाहिनीची दुरुस्ती : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या १,११८ मिमी व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील गळती दुरुस्त करण्यात येईल.
२. चार जलकुंभांना जोडणी : आमेरनगर, सुधाकरनगर, एसएफएस गारखेडा आणि एजीपी हायस्कूल परिसरातील जलकुंभांना पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिन्या मुख्य जलवाहिनीशी जोडल्या जातील.
३. ज्योतीनगर, विश्वभारतीला जोडणी : या परिसरांतील जलकुंभ भरण्यासाठी मुख्य जलवाहिनीला छेद जोडणी (क्रॉस कनेक्शन) देण्यात येणार आहे.