काय असतो गाव नमुना? माहिती आहे का?

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात.
 village modle
village modle sakal

अनेक जण गाव नमुन्‍यासंदर्भात चर्चा करतात. मात्र, कित्येकांना तो काय असतो, हे माहिती नसते. बहुतांश जण फक्त नमुना नंबर आठविषयीच बोलतात. पण, खरे सांगायचे तर तलाठी दफ्तरी एक नव्हे तर तब्बल २१ गाव नमुन्यांची नोंद असते.

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ अन्वये प्रत्येक गावातील जमिनीची कागदपत्रे ही त्या गावातील तलाठी कार्यालयात असतात, नोंदी असतात. या नोंदवहीस वेगवेगळा अर्थ असतो. बघूया नमुना नंबर आणि त्याचा अर्थ

गाव नमुना नंबर - १ : या नोंदवहीमध्ये भूमी अभिलेख खात्याकडून आकारबंध केलेला असतो. ज्यामध्ये जमिनीचे गट नंबर, सर्व्हे नंबर दर्शविलेले असतात व जमिनीच्या आकारा (ॲसेसमेंट) बाबतीत माहिती असते.

गाव नमुना नंबर - १ अ : वन जमिनीची माहिती मिळते. गावातील वन विभागातील गट कोणते हे समजते. तशी नोंद या वहीत असते.

नमुना नंबर - १ ब : सरकारच्या मालकीच्या जमिनीची माहिती मिळते.

नमुना नंबर - १ क : कूळ कायदा, पुनर्वसन कायदा, सीलिंग कायद्यानुसार भोगवटादार यांना दिलेल्या जमिनी याबाबतची माहिती असते. सातबाराच्या उताऱ्यामध्ये नवीन शर्त असल्यास जमीन कोणत्या ना कोणत्या तरी पुनर्वसन कायद्याखाली किंवा वतनाखाली मिळालेली जमीन आहे, असे ठरविता येते.

नमुना नंबर - १ ड : कूळ वहिवाट कायदा अथवा सीलिंग कायद्यानुसार अतिरिक्त जमिनी, त्यांचे सर्व्हे नंबर व गट नंबर याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - १ ई : गावातील जमिनींवरील अतिक्रमण व त्याबाबतची कार्यवाही ही माहिती मिळते.

नमुना नंबर - २ : गावातील सर्व बिनशेती (अकृषिक) जमिनींची माहिती मिळते.

नमुना नंबर - ३ : दुमला जमिनींची नोंद मिळते. म्हणजेच देवस्थानासाठीची नोंद पाहता येते.

नमुना नंबर - ४ : गावातील जमिनीचा महसूल, वसुली, विलंब शुल्क याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ५ : गावाचे एकूण क्षेत्रफळ, गावाचा महसूल, जिल्हा परिषदेचे कर याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ६ : (हक्काचे पत्रक किंवा फेरफार) जमिनीच्या व्यवहारांची माहिती; तसेच खरेदीची रक्कम, तारीख व कोणत्या नोंदणी कार्यालयात दस्त झाला, याची माहिती मिळते.

नमुना नंबर - ६ अ : फेरफारास (म्युटेशन) हरकत घेतली असल्यास त्याची तक्रार व चौकशी अधिकाऱ्यांचा निर्णय याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ६ क : वारस नोंदीची माहिती मिळते.

नमुना नंबर - ६ ड : जमिनीचे पोटहिस्से, वाटणी किंवा भूमी संपादन याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ७ : (७/१२ उतारा) जमीनमालकाचे नाव क्षेत्र, सर्व्हे नंबर, हिस्सा नंबर, गट नंबर, पोटखराबा, आकार, इतर बाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ७ अ : कूळ वहिवाटीबाबतची माहिती मिळते. उदाहरणार्थ ः कुळाचे नाव, आकारलेला कर व खंड याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - ८ अ : जमिनीची नोंद, सर्व्हे नंबर, आपल्या नावावरील क्षेत्र व इतर माहिती मिळते.

नमुना नंबर - ८ ब, क व ड : गावातील जमिनीच्या महसूल वसुलीची माहिती मिळते.

नमुना नंबर - ९ अ : शासनाला दिलेल्या पावत्यांची माहिती मिळते.

नमुना नंबर - १० : गावातील जमिनीच्या जमा झालेल्या महसुलाची माहिती मिळते.

नमुना नंबर - ११ : प्रत्येक गटामध्ये सर्वे नंबर, पीकपाणी व झाडांची माहिती मिळते.

नमुना नंबर - १२ व १५ : पिकाखालील क्षेत्र, पडीक क्षेत्र, पाण्याची व्यवस्था व इतर बाबींची माहिती मिळते.

नमुना नंबर - १३ : गावाची लोकसंख्या व गावातील जनावरे याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - १४ : गावाच्या पाणीपुरवठ्याबाबतची माहिती; तसेच वापरली जाणारी साधने याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - १६ : माहितीपुस्तके, शासकीय आदेश व नवीन नियमावली याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - १७ : महसूल आकारणी याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - १८ : सर्कल ऑफिस, मंडल अधिकारी यांच्या पत्रव्यवहाराची माहिती असते.

नमुना नंबर - १९ : सरकारी मालमत्तेबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - २० : पोस्ट तिकिटांची नोंद याबाबतची माहिती मिळते.

नमुना नंबर - २१ : सर्कल यांनी केलेल्या कामाची दैनंदिन नोंद याबाबतची माहिती मिळते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com