esakal | Covid 19 : कोरोना बरा होतो; तरीही एड्सपेक्षा धोकादायक का?
sakal

बोलून बातमी शोधा

Why is Corona More Dangerous Than HIV

कोरोना झालेले अनेक जण अवघ्या १५ ते २० दिवसांत ठणठणीत झाले. उलट एचआयव्हीपासून होणारा एड्स आणि एचबीव्हीपासून होणारा हेपॅटायटिस-बी कधीच शरीरातून जात नाही;

Covid 19 : कोरोना बरा होतो; तरीही एड्सपेक्षा धोकादायक का?

sakal_logo
By
विकास देशमुख

औरंगाबाद  : कोरोनापासून कोविड-१९ हा आजार होतो. चीनमध्ये हा आजार झालेले ९० टक्क्यांपेक्षा अधिक रुग्ण अवघ्या १५ ते २० दिवसांत ठणठणीत झाले. उलट एचआयव्हीपासून होणारा एड्स आणि एचबीव्हीपासून होणारा हेपॅटायटिस-बी कधीच शरीरातून जात नाही; पण कोरोनाबाधित व्यक्ती खोकलली किंवा शिंकली तरीही तिच्या आजूबाजूच्या व्यक्ती बाधित होऊ शकतात. त्यामुळे जगातील हा आतापर्यंतचा सर्वांत भयानक विषाणू असल्याचे वैद्यकीयतज्ज्ञ सांगत आहेत. 

संबंधित बातमी - भयंकर! कुत्रा, मांजर, चिमणीलाही कोरोना, आता मनुष्याचे काय ?

एचआयव्ही आणि एचबीव्हीची लागण केवळ संक्रमित व्यक्तीचे रक्त, शरीरसंबंध या दोन मुख्य कारणांनी होते. बाधितासोबत जेवण केल्याने, हात मिळवल्याने, बाधित शिंकल्याने, खोकलल्याने प्रसार होत नाही; पण कोरोनाबाधित व्यक्ती मोठ्याने बोलली, हसली, शिंकली आणि खोकलली तरी तिच्या तोंडातून निघणाऱ्या तुषारातून लाखो विषाणू बाहेर पडतात. परिणामी, संक्रमण झपाट्याने होते. त्यामुळे हा विषाणू अधिक धोकादायक आहे. 
  
ही आहेत कारणे 
कोरोनाचा प्रसार झपाट्याने होतो. शिवाय बाधितांची संख्या गुणाकाराने वाढत जाते. ही संख्या वाढत गेली तर आपल्याकडे रुग्ण आणि त्या तुलनेत डॉक्टर, रुग्णालयातील बेड, व्हेंटिलेटर, पीपीई किट उपलब्ध नाहीत. आरोग्य संस्था कोलमडेल. लॉकडाऊन हा प्रभावी उपाय आहे; पण तो दीर्घकाळासाठी धोकादायक आहे. आरोग्याच्या दृष्टीने तो फायद्याचा असला तरीही सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वाईट परिणाम करणारा आहे. या सगळ्या कारणांनी कोरोना इतर विषाणूपेक्षा अधिक धोकादायक आहे. 
 
हा आहे फरक 
 

कोरोना

एचआयव्ही, एचबीव्ही 

लक्षणे १४ दिवसांत लक्षणे पाच ते २० वर्षांत 
संपर्कातील प्रत्येकाला संसर्गाचा धोका केवळ शरीरसंबंध आणि रक्तातूनच धोका 
श्वसन व्यवस्थेवरच अचानक हल्ला काही वर्षांनंतर विषाणूचा शरीरावर हळू परिणाम 
बाधिताला विलग ठेवावेच लागते सर्वसामान्यांप्रमाणे बाधित घरांमध्ये राहू शकतो. 
विषाणू कपडे, वस्तू, जमिनीवर कित्येक तास राहतो मानवी शरीराबाहेर काही सेकंदात नष्ट 
प्रसार झपाट्याने प्रसार खूप कमी प्रमाणात 

 
कोरोनाचा ज्या वेगाने प्रसार होतो, त्या तुलनेत इतर कोणत्याच विषाणूमुळे अशी रुग्णसंख्या वाढत नाही. आपल्याकडे रुग्णालये, डॉक्टर्स, नर्स यांची संख्या अगोदरच कमी आहे. रुग्णसंख्या वाढली तर देशासमोर आतापर्यंतचे हे सर्वांत मोठे संकट असेल. 
- डॉ. अनिल कावरखे, एमबीबीएस, एमडी. 
 

loading image
go to top