फोटो- वर्ल्ड सिनेमा ABD26J78826
छत्रपती संभाजीनगर ः ‘वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलच्या पुरस्कार सोहळ्यातील विजेते कलाकार.
--
‘वर्ल्ड सिनेमा’चा पहिला पुरस्कार सोहळा उत्साहात
छत्रपती संभाजीनगर, ता. ७ ः विविध देशांतील आणि भाषांमधील चित्रपट, लघुपट, माहितीपट व संगीत व्हिडिओ कलाकृतींना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या ‘वर्ल्ड सिनेमा इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलचा पहिला पुरस्कार सोहळा’ रविवारी (ता. सहा) मौलाना आझाद रिसर्च सेंटर टीव्ही सेंटर येथे पार पडला.
फिल्म एज्युकेशन ॲण्ड वेल्फेअर फाउंडेशनच्या वतीने आयोजित या सोहळ्यास अभिनेता संजय बनसोडे, जलसंपदा विभागातील सहायक कक्ष अधिकारी रवींद्र बोर्डे, कवी-गीतकार पाशा खान, सीमा खान, निर्माता रघुनाथ साळवे, अनिता साळवे, राजू कांबळे, अब्दुल्ला आजलानी, उमेश निकाळजे आदींची उपस्थिती होती. यावेळी तुषार थोरात, लक्ष्मी थोरात, सुशांत पाटील, सागर जाधव व पोपट थोरात यांनी आयोजन केले होते. महोत्सवात विविध देशांतून सहभागी झालेल्या कलाकृतींचे परीक्षण करून दिग्दर्शक, निर्माता, सहनिर्माता, पटकथा लेखक, कलाकार, छायाचित्रकार, संगीतकार, गायक, संपादक तसेच तांत्रिक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. आयोजक तुषार थोरात यांनी जागतिक स्तरावरील चित्रपटांना एकत्र आणतानाच नवोदित कलावंतांना आंतरराष्ट्रीय व्यासपीठ मिळवून देणे हा महोत्सवाचा उद्देश असल्याचे सांगितले. सूत्रसंचालन महेश माने व गौरी गोजे यांनी केले.
-----