world peace day 2022 : चला, शांती प्रस्थापित करूया...! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

world peace day 2022

world peace day 2022 : चला, शांती प्रस्थापित करूया...!

जगाने दोन महायुद्ध आणि अनेक शितयुद्धांत झालेला निरपराध लोकांचा नरसंहार पहिला होता. जगाला युद्ध नको, तर शांती हवी आणि त्यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न होणे अगत्याचे असून आता जगाला युद्ध परवडणारे नाही ! हे कळून चुकले होत. त्यामुळेच १९८१ साली झालेल्या राष्ट्रकुल बैठकीत २१ सप्टेंबर हा "जागतिक विश्वशांती दिन" म्हणून घोषित करण्यात आला ! तसं पाहिलं तर, सर्वकाळ शांती प्रस्थापित व्हावी यासाठी जगाच्या इतिहासात भारताचे स्थान सर्वोच आहे ! इसविसनपूर्व पाचव्या शतकांत जन्मलेल्या राजपुत्र सिद्धार्थ गौतम बुद्धाने माणूस दु:खी का आहे

(?), आपल्या राज्यातील सर्व वाद संपुष्टात यावेत आणि संपूर्ण राज्य सुख शांतीने नांदावे यासाठी सर्वसंग परित्याग करून केवळ ज्ञान प्राप्त केले आणि "जगाला केवळ शांततेची नितांत गरज आहे !" याचे प्रतिपादन केले. त्याचबरोबर इसविसनपूर्व तिसऱ्या शतकांतील महान चक्रवर्ती सम्राट अशोकाने जेंव्हा कलिंगच्या युद्धातील नरसंहार पहिला, त्यानंतर त्याने बुद्ध धम्म स्वीकारून उर्वरित आयुष्य लोककल्याणाकरिता व्यतीत करायचे ठरवले ! त्यानंतर अनेक भारतीयांनी जगात शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला.

दक्षिण आफ्रिकेत नेल्सन मंडेलांनी दहा हजार दिवस तुरुंगात काढून शांततेच्या मार्गाने सत्ता परिवर्तन घडवून आणले ! दुसरीकडे भारतीय स्वातंत्र्याचा प्रदीर्घ लढ्यात राष्ट्रपिता महात्मा गांधींनी अहिंसा मार्गाने लढा देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून दिले ! स्वामी विवेकानंदानी अमेरिकेच्या धर्म परिषदेत 'माझ्या बंधू आणि भगिनींनो' हे दोन शब्द उच्चारून संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे वेधून घेतले !

मित्रांनो, अजून जगावरील कोरोनाचे संकट निर्वाळले नाही ! दुसरीकडे रशिया-युक्रेन युद्धात दोन्ही देश अक्षरश: नेस्तनाबूत झाले आहेत ! तिसरीकडे सामान्य लोकांनी श्रीलंकेतील जुलमी राजसत्ता उलथून टाकली आहे ! वर्तमानातील ह्या सर्वच घटना अत्यंत बोलक्या असून, यातून जगाने आणि माणसाने सुद्धा बोध घेण्याची वेळ येऊन ठेपली आहे ! माणसाला आनंदी जगण्यासाठी साधनांची नाही तर शांततेची नितांत आवश्यकता आहे ! जगातील अनेक देशाकडे अणुबॉम्ब सारखी महाभयंकर नरसंहारक शस्त्र असली तरी त्या शस्त्रांचा उपयोग काय ? जग जिंकल्यावर सिकंदर 'आता कुणाला जिंकू ?' म्हणून रडला आणि आत्महत्या केली ! सर्व १०१ कौरव मेल्यानंतर 'आता जागून काय उपयोग ?' असा प्रश्न करून पाचही पांडव राज्यत्याग करून निघून जातात ! म्हणजेच जगाला कधीच युद्धाची गरज नव्हती आणि नाही सुद्धा ! जगाला शांतता आणि प्रेमाची नितांत गरज आहे !

तेंव्हा चला तर मग, आज "विश्वशांती दिनाच्या" निमित्ताने आपल्या महान पूर्वजांचा वसा आणि वारसा जतन करुया ! आपले घर, परिसर, राज्य, देश आणि संपूर्ण जग कसे सुख-समाधान-आनंद-शांततेत नांदेल (?) यासाठी संत ज्ञानेश्वरांच्या पसायदानातील

दुरिताचें तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्यें पाहो ।

जो जें वांच्छील तो तें लाहो । प्राणिजात ॥

या ओव्या असो कि; बृहदारण्यकोपनिषद् या प्राचीन ग्रंथातील

ॐ असतो मा सद्गमय। तमसो मा ज्योतिर्गमय।

मृत्योर्माऽमृतं गमय। ॐ शान्ति: शान्ति: शान्ति: ॥

या महत्वपूर्ण प्रार्थनेसह घराघरांत शांतता प्रस्थापीत होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करूयात ! प्रत्येक घरी शांतीदीप प्रज्वलित होऊन जगभर शांती नांदावी यासाठी प्रार्थना करूयात ! स्वतः शांत-आनंदी रहा आणि जगाला शांतीचा, प्रेमाचा संदेश द्या ! ॐ शान्ति: शान्ति: शान्ति:!

प्रा.डॉ.विठ्ठल खंडूजी जायभाये

Web Title: World Peace Day 2022 Let Establish Peace World Desperately Needs

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..