यशवंतराव चव्हाण विचार मंचचे पुरस्कार जाहीर
---
नांदेड, ता. १२ : यशवंतराव चव्हाण विचार मंच, नांदेड (रोहिपिंपळगाव) यांच्या वतीने दिले जाणारे पुरस्कार जाहीर केले. यामध्ये पत्रकार आनंद कल्याणकर यांना ‘स्वातंत्र्यसैनिक एकनाथराव पाटील समाजभूषण पुरस्कार’, कृषिपुत्र गोपाळ पाटील इजळीकर यांना ‘ह.भ.प. संभाजीराव पाटील ग्रामविकास पुरस्कार’ जाहीर झाला आहे.
लेखक प्र.श्री. जाधव यांना ‘प्रा. प्र.भा. काळे (उमरखेड) साहित्य गौरव पुरस्कार’ जाहीर करण्यात आला आहे. आपल्या तीन मुलांच्या शिक्षणासाठी दिलेले योगदान तसेच पती गोविंदराव मेथे यांना दिलेली साथ यामुळे कुटुंबासाठी आदर्श निर्माण करणाऱ्या कल्पनाताई गोविंदराव मेथे यांना ‘कै. लताबाई नारायणराव शिंदे आदर्श गृहदेवता पुरस्कार’, त्यांच्या तीन मुलांपैकी एक मुलगा डॉक्टर, दुसरा प्राध्यापक तर तिसरा इंजिनिअर झाला असून, त्यांच्या जडणघडणीत कल्पनाताई मेथे यांचे मोठे योगदान आहे. या पुरस्कारांचे स्वरूप स्मृतिचिन्ह, ग्रंथ, शाल व पुष्पहार असे आहे. पुरस्कारांची निवड वेणूकार कवी प्रा. नारायण शिंदे, लेखक प्रा. व्यंकटी पावडे, डॉ. गोविंद भाकरे, प्रा. अनमोलसिंघ कामठेकर, शिवाजी देशमुख, डॉ. भारत कचरे, प्रा. सटवा शिंदे, प्रा. गोविंद गव्हाणे, रामेश्वर शिंदे यांनी केली. हे पुरस्कार आगामी काळात सन्मानपूर्वक समारंभात प्रदान करण्यात येतील, अशी माहिती मंचचे अध्यक्ष नारायण शिंदे यांनी दिली.