esakal | औशातील रस्त्यावर शुकशुकाट, जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

बोलून बातमी शोधा

Janta Curfew, Ausa

रस्त्यावर चिटपाखरूही नाही, जिकडे पाहावे तिकडे बंद दुकाने आणि घरे दिसून येतात फक्त गस्त घालणारे पोलीस कर्मचारी अशी शांतता औसा शहरात रविवारी (ता.२२) जनता संचारबंदीच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. औशाच्या इतिहासात प्रथमच जनतेकडून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

औशातील रस्त्यावर शुकशुकाट, जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

sakal_logo
By
जलील पठाण

औसा  (जि.लातूर) : रस्त्यावर चिटपाखरूही नाही, जिकडे पाहावे तिकडे बंद दुकाने आणि घरे दिसून येतात फक्त गस्त घालणारे पोलीस कर्मचारी अशी शांतता औसा शहरात रविवारी (ता.२२) जनता संचारबंदीच्या निमित्ताने पाहावयास मिळाली. औशाच्या इतिहासात प्रथमच जनतेकडून एवढा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


जगभर झपाट्याने वाढत चाललेल्या कोरोना विषाणूचा पाडाव करण्यासाठी व त्याचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी संपूर्ण देशात जनता संचारबंदी पाळण्याचे आवाहन केले होते. कुणीही घराबाहेर पडू नका असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले होते. त्याला शहरातील नागरिकांनी आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून व बाहेर न पडता या आवाहनाला प्रतिसाद दिला. फक्त पोलीस कर्मचारी गस्त घालतांना दिसत आहेत. औसा आगारातील शेकडो बसेस आगारात उभ्या आहेत. येथील अप्रोच रोड चौकापासून ते थेट किल्ला मैदानापर्यंय कुठेही माणूस दिसला नाही. सर्व हॉटेल, पान टपऱ्या शनिवारपासून (ता .२१) बंद आहेत.

वाचा  ः उदगीरात दोन पानटपरी चालकांना पोलिसांचा दणका, गुन्हा दाखल

आणीबाणीच्या प्रसंगसाठी येथील ग्रामीण रुग्णालयाचे सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी सज्ज आहेत. रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अंगद जाधव व तालुका आरोग्य अधिकारी आर. आर. शेख यांनी आपली कुमक तयार ठेवली आहे. औसा शहराच्या इतिहासात प्रथमच एवढा कडकडीत बंद औसेकर अनुभवला. उपविभागीय पोलीस अधिकारी राजीव नवले, तहसिलदार शोभा पुजारी आणि औसा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नरसिंह ठाकूर हे परिस्थितीवर बारीक नजर ठेवून असून नागरिकांनी घरच्या बाहेर पडू नये असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले आहे.

उजनी कडकडीत बंद
उजनी  (जि.लातूर) ः कोरोना विषाणूचा नायनाट करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीनीं जनता संचारबंदीच्या माध्यमातून केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत रविवारी (ता.२२) येथील ग्रामस्थांनी घरातच बसणे पसंद केले. तसेच व्यावसायिकांनी ही आपली दुकाने बंद ठेवण्यात आल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिणामी येथील रहदारीचे ठिकाण मुख्य बाजापेठ व उजनी मोडवर शुकशुकाट पाहायला मिळाला. उजनी सोबत परिसरातील एकंबी, एकंबी तांडा, टाका, शिवली, बिरवली आदी गावात ही जनता संचारबंदीला पूर्णपणे सकारात्मक प्रतिसाद पाहायला मिळाला.