प्रेरणादायक! मुलाला बनवायचंय खराखुरा फौजदार : बहुरूपी बापाचे स्वप्न

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 6 February 2020

हुबेहूब फौजदार साकारून मनोरंजन करणाऱ्या चव्हाण यांना आपल्या मुलाला मात्र "असली' फौजदार बनवायचे आहे. त्यासाठी मिळालेल्या दानातील काही वाटा ते राखीव ठेवत आहेत... 

गुंजोटी (ता. उमरगा) : वेगाने बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर बरेच पारंपरिक कलाप्रकार लोप पावत गेले. वेगवेगळ्या माध्यमांतून मनोरंजनात्मक कार्यक्रम घराघरांत पोचल्यामुळे काही पारंपरिक कला अखेरची घटिका मोजत आहेत. त्यात बहुरूपी कलेचा समावेश आहे.

परंपरेने आलेला हा वारसा जतन करण्यासाठी काहींची धडपड सुरू आहे. त्यात मुळज (ता. उमरगा) येथील दत्ता देवराम चव्हाण हे ही कला जोपासण्यासाठी राज्यभर भटकंती करीत आहेत. त्यातून मिळणाऱ्या अल्प बिदागीवर ते 11 सदस्यीय कुटुंबाचा डोलारा सांभाळत आहेत.

हुबेहूब फौजदार साकारून मनोरंजन करणाऱ्या चव्हाण यांना आपल्या मुलाला मात्र "असली' फौजदार बनवायचे आहे. त्यासाठी मिळालेल्या दानातील काही वाटा ते राखीव ठेवत आहेत... 

बेचाळीस वर्षांचा तो अन् सोळा वर्षांची ती... वाचा काय झाले

खाकी वर्दी, डोक्‍यावर टोपी, हातात दंडुका, एका हातात डायरी, गळ्यात पिशवी, तोंडात शिटी असे रूप धारण करून चव्हाण हे फौजदार बनतात आणि गावोगावी मनोरंजन करतात. वंशपरंपरेने चालत आलेला वारसा टिकवताना आता स्पर्धात्मक युगात पोटाची खळगी भरत नाही. सोशल मीडिया, टीव्हीद्वारे घरबसल्या लोकांचे मनोरंजन होत आहे. बहुरूपी कलेकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याची खंत ते व्यक्त करतात.

...म्हणून तिने केले केशदान

पोटाची खळगी भरण्यासाठी, लोकांचे लक्ष वेधण्यासाठी वेगवेगळ्या नकला कराव्या लागतात, तेव्हा कुठे अल्पशी बिदागी हातावर पडते, असे ते सांगतात. सुगीच्या दिवसांत ते शेतात राशी करीत रोजगार मिळवतात. वर्षातून बरेच दिवस पश्‍चिम महाराष्ट्रात असतात. महिनाभर तालुका पातळीवर नकला करतात. चार पैसे मिळावेत म्हणून नवनवीन गाव गाठावे लागते. त्यात दमछाक होते. पण कुटुंबासाठी ते करावे लागते, असे चव्हाण सांगतात.

अकरा जणांच्या कुटुंबाचा सांभाळ

त्यांच्या कुटुंबात आई-वडील, भावंडे, पत्नी, चार मुली, मुलगा असे 11 सदस्य आहेत. मुलगा विष्णू चव्हाण याच्या वाट्याला हा संघर्ष येऊ नये, म्हणून त्याने खराखुरा फौजदार व्हावे, असे त्यांचे स्वप्न आहे. त्यासाठी दत्ता चव्हाण हे मिळणाऱ्या बिदागीतून काही वाटा त्याच्या शिक्षणासाठी बाजूला काढून ठेवतात. दोन मुलींचे विवाह झाले असून अन्य दोन मुलीही शालेय शिक्षण घेत आहेत. 

कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी बहुरूपी फौजदार बनून लोकांचे मनोरंजन करत असलो तरी माझ्या मुलाला उच्चशिक्षित करून फौजदार बनवण्यासाठी धडपड सुरू आहे. हलाखीच्या परिस्थितीत मुलाच्या शिक्षणासाठी ओढाताण होते; पण हेही दिवस जातील, अशी आशा आहे. मुलांच्या शिक्षणातून नवी ऊर्जा मिळते. 
- दत्ता चव्हाण, बहुरूपी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bahurupi Samaj News Umarga Latur News