केळीला मिळतोय केवळ अडीचशे रुपये भाव

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 एप्रिल 2020

लॉकडाउनचे कारण पुढे करत व्यापारी अडीचशे ते चारशे रुपये क्विंटल दराने केळी पिकाची खरेदी करीत आहेत. सध्या होत असलेली विक्री पाहता लागवडीचा खर्च सुद्धा निघणे आवघड झाले आहे. तसेच परिसरातील फळ भाज्या उत्पादकदेखील अडचणीत सापडले आहेत. 

डोंगरकडा (जि. हिंगोली) : कळमनुरी तालुक्‍यातील डोंगरकडा येथे केळी उत्‍पादक शेतकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. केळीला चांगला भाव मिळत असल्याने उत्‍पादक वाढले आहेत. यावर्षी मात्र कोरोनाच्या संसर्गामुळे केळीची खरेदी अडीचशे ते चारशे रुपये क्‍विंटलप्रमाणे होत असल्याने शेतकऱ्यांसमोरील अडचणी वाढल्या आहेत.

डोंगरकडा केळीसाठी प्रसिद्ध आहे. दरवर्षी दूरवरचे व्यापारी केळी खरेदीसाठी येतात. या वर्षीदेखील केळीचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. सध्या केळीची विक्री सुरू झाली आहे. मात्र, कारोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संचारबंदी, लॉकडाउन करण्यात आल्याने बाजारपेठ ठप्प आहे. 

हेही वाचाहिंगोलीत दोघांचे अहवाल निगेटिव्ह तर दोघांचे प्रलंबित

लॉकडाउनचे कारण

त्यामुळे व्यापारीही खरेदीसाठी फिरकत नसल्याचे चित्र आहे. खरेदीदार नसल्याने कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ उत्‍पादकांवर आली आहे. मागच्या वर्षी सोळाशे ते सतराशे रुपये प्रतिक्विंटल दर केळीला होता. परंतु, या वर्षी लॉकडाउनचे कारण पुढे करत व्यापारी अडीचशे ते चारशे रुपये क्विंटल दराने खरेदी करीत आहेत.

लागवडीचा खर्च निघणे आवघड

यातून पिकासाठी झालेला खर्चही निघत नसल्याचे चित्र आहे. एक हजार रोपामागे एक ते दीड लाख खर्च करावा लागतो. सध्या होत असलेली विक्री पाहता लागवडीचा खर्च सुद्धा निघणे आवघड झाले आहे. तसेच परिसरातील फळ भाज्या उत्पादकदेखील अडचणीत सापडले आहेत. बाजार बंद असल्याने भाजीपाला जागेवरच सडून जात आहे. या प्रकाराने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत.

 

भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान

माझ्याकडे चार हजार केळीची झाडे आहेत. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्‍हणून संचारबंदी असल्याने शहरातील रस्‍ते बंद असून बाजारदेखील बंद आहे. त्यामुळे अडचणी निर्माण झाल्या असून या वर्षी केळीसह भाजीपाला पिकांचेदेखील नुकसान झाले आहे.
-बाळासाहेब नरवाडे, शेतकरी

 

येथे क्लिक करातीन दिवसांच्या बंदनंतर गर्दीची एकच झुंबड, कुठे ते वाचा...

वारंगा फाटा परिसरातील शेतकऱ्यांचे नुकसान

कळमनुरी तालुक्‍यातील वारंगाफाटा येथून इसापूर धरणाचा कालवा जातो. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांची जमीन सिंचनाखाली आहे. या भागातील शेतकरी नगदी पिके घेतात. यात ऊस, केळी, हळद या पिकांचा समावेश अधिक असतो. या वर्षीदेखील मोठ्या प्रमाणावर केळीची लागवड झाली आहे. मागच्या वर्षी केळीला १४०० ते १८०० रुपये क्‍विंटलचा भाव मिळाला होता. 

कवडीमोल दराने विक्री

मात्र, लॉकडाउन झाल्यामुळे दळणवळण पूर्णतः ठप्प झाले आहे. परिणामी मागणीत घट झाल्यामुळे व्यापारीदेखील फिरकत नसल्याचे चित्र आहे. एखादा व्यापारी खरेदीस आलाच तर ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल प्रमाणे केळीची खरेदी होत आहे. हजारो रुपये खर्च करून उभी केलेली बाग कवडीमोल दराने विक्री करावी लागत आहे. शेतकरी मात्र, आर्थिक आणीबाणीत सापडला आहे. या परिसरातील आर्थिक घडी केळी पिकावर अवलंबून आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Banana is getting only Rs250 Hingoli news