esakal | बॅंकॉक-औरंगाबाद विमानसेवेला गतिरोधक
sakal

बोलून बातमी शोधा

औरंगाबाद - शहरातील विविध क्षेत्रांतील लोकांशी सीएमआयए कार्यालयात संवाद साधताना इकापोल पूलपिपाट (मध्यभागी). डावीकडून सोबत नितीन गुप्ता, राम भोगले, उमेश दाशरथी, कमलेश धूत.

बॅंकॉक-औरंगाबाद विमानसेवेला गतिरोधक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

औरंगाबाद - बुद्धिस्ट सर्किट जोडण्यासाठी प्रयत्नशील असलेले थायलॅंड, बॅंकॉक येथून औरंगाबादसाठी थेट विमानसेवा देण्यासाठी सकारात्मक आहे. मात्र, द्विपक्षीय करारांतर्गत असलेल्या अटीशर्ती या सेवेसाठी गतिरोधक ठरत असल्याचे थायलॅंडचे कॉन्सूल जनरल इकापोल पूलपिपाट यांनी सांगितले. 

महाराष्ट्र असोसिएशन ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲण्ड ॲग्रिकल्चर (माकिआ) आणि चेंबर ऑफ मराठवाडा इंडस्ट्रिज ॲण्ड ॲग्रिकल्चरतर्फे आयोजित संवाद कार्यक्रमात इकापोल पूलपिपाट यांनी शहरातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत लोकांशी शनिवारी (ता. २१) संवाद साधला. बॅंकॉक आणि औरंगाबाद ही दोन्ही ठिकाणे बुद्धिझमच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहेत. त्यांना विमानसेवेने जोडण्याची मागणी माकिआचे उपाध्यक्ष उमेश दाशरथी यांनी आपल्या प्रास्ताविकात केली. त्याला उत्तर देताना श्री. पूलपिपाट यांनी द्विपक्षीय कराराबाबत सांगत जाचक अटींमुळे ही विमानसेवा अद्याप सुरू झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर सीएमआयएचे अध्यक्ष राम भोगले यांनी नागरी उड्डयन मंत्रालयाने केलेला नियमातील बदल अधिक सोयीचे असल्याचे सांगितले. त्याविषयी अधिक जाणून घेऊन थायलॅंडच्या कॉन्सुलेटला कळवणार असल्याचे नमूद केले. सार्क राष्ट्रांना यात कोणतीही बंधने नव्हती, आता ‘आसियान’(असोसिएशन ऑफ साउथईस्ट एशियन नेशन्स) अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रांनाही अटी शिथिल करण्यात आल्या आहेत आणि याचा थायलॅंड सदस्य असल्याचे श्री. भोगले पुढे म्हणाले. मोहिनी केळकर, प्रसाद कोकीळ, अजय शहा, तनसूख झांबड, जसवंत सिंग, डुंगरसिंग राजपुरोहित, नितीन गुप्ता, अभय हंचनाळ, मनीष गुप्ता आदींची उपस्थिती होती.

औरंगाबादेत होणार थाय मोनेस्ट्री 
बौद्ध धर्मावर आधारित अनेक लेणी औरंगाबाद आणि परिसरात आहेत. या दौऱ्यात आपण औरंगाबाद लेणी परिसर फिरून पाहिला आणि येथे एक थाय मोनेस्ट्री उभारण्याबाबात आपला विचार असल्याचे इकापोल पूलपिपाट यांनी सांगितले.