esakal | बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे- हेमंत पाटील
sakal

बोलून बातमी शोधा

पीक कर्ज वाटप करा

बँकांनी तातडीने शेतकऱ्यांना पीककर्ज वाटप करावे- हेमंत पाटील

sakal_logo
By
राजेश दार्वेकर

हिंगोली : खरीप हंगाम पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना बी- बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी हिंगोली जिल्हा आणि मतदारसंघातील बँकांनी शेतकऱ्यांना तातडीने पीककर्जाचे वाटप करावे याप्रकरणी खासदार हेमंत पाटील यांनी आक्रमक भूमिका घेऊन बँकांनी अद्याप कोणतीही सक्षम यंत्रणा कार्यान्वित केली नसल्यानेच शेतकऱ्यांना पीककर्ज मिळण्यास विलंब होत आहे. त्यामुळे बँकांनी तात्काळ पीककर्जाचे वाटप करण्यासाठी याबाबत यंत्रणा कार्यन्वित करण्याचे निर्देश दिले.

खरीप हंगाम तोंडावर येऊनही राष्ट्रीयकृत बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करीत नसल्यामुळे हिंगोली, नांदेड आणि यवतमाळ जिल्ह्यातील शेतकरी हतबल झाला आहे. कोरोना विषाणू कालखंड, लॉकडाऊन आणि मागील वर्षी झालेली अतिवृष्टी यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अश्या अवस्थेत अडकलेल्या शेतकऱ्याला पीककर्ज हा एकमेव पर्याय शिल्लक आहे. जगाचा पोशिंदा जगाला तरच देश जगेल, त्यामुळे शेतकऱ्याच्या हिताला प्रथम प्राधान्य दिले जावे, दरवर्षी शेतकरी अस्मानी आणि सुलतानी संकटानी भरडून निघतो, त्यामुळेच शेतकऱ्यांकडे पीककर्ज घेऊन पेरणी करण्या व्यतिरिक्त पर्याय उरलेला नाही. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करुन ठेवली असून शेतकऱ्यांना आता पेरणीची प्रतीक्षा लागली आहे. आणि पेरणी करण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसा नसल्याने बँकेकडून मिळणाऱ्या पीककर्जाची वाट पाहत आहेत.

हेही वाचा - उगमापासून ते कर्नाटकच्या हद्दीपर्यंतच्या भीमा नदीच्या प्रवासाचा अभ्यास प्रथमच होणार आहे.

परंतु जिल्ह्यातील बँकांनी अजून कोणतीच यंत्रणा उपलब्ध केली नसल्याने अनेक शेतकऱ्यानी खासदार हेमंत पाटील यांच्याकडे तक्रारी करून पीककर्ज वाटपाची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर खासदार पाटील यांनी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासोबत बैठक घेतली. दरम्यान त्यांनी बँकांनी शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करावा यासाठी जिल्ह्यातील सर्व बँक अधिकाऱ्यांची तात्काळ बैठक लावावी अशी मागणी केली. या सोबतच बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य शेतकरी व ग्राहकांना सन्मानाची वागणूक द्यावी, अरेरावीची भाषा वापरू नये, कोणत्याही कागद पत्रासाठी शेतकऱ्यांची अडवणूक करु नये, शेतकऱ्यांना सहकार्य करावे अशा सूचनाही खासदार पाटील यांनी या वेळी केल्या.

या बैठकीस शिवसेना हिंगोली जिल्हा समन्वयक दिलीप बांगर, सहसंपर्कप्रमुख डॉ. रमेश शिंदे, उपजिल्हाप्रमुख परमेश्वर मांडगे, उध्दव गायकवाड, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक शशिकांत सावंत यांच्यासह आदी उपस्थित होते.

संपादन- प्रल्हाद कांबळे