बापरे, दोन दिवसात आठशेवर कोंबड्या मृत्यूमुखी, मुरुंबा येथील प्रकार

सकाळ वृतसेवा 
Friday, 8 January 2021

परभणी तालुक्यातील मुरुंबा येथील एका कुक्कुटपालन केंद्रात मृत्यूमुखी पडलेल्या कोंबड्यांची पशुसंवर्धन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. 

परभणी ः तालुक्यातील मुरूंबा येथे दोन दिवसातच आठशेवर कोंबड्या मृत्यूमुखी पडल्यामुळे पक्षी पालकात खळबळ उडाली असून गावशिवाराच्या पाच किलोमिटर अंतरात कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक करण्यास जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता.आठ) एका आदेशान्वये बंदी घातली आहे. 

राज्यात बर्ड फ्ल्युने शिरकाव केला असून या पार्श्वभूमीवर खबरदारी घेतली जात आहे. मुरुंबा येथील एका कुक्कुटपालन केंद्रात गत दोन दिवसात मोठ्या प्रमाणावर कुक्कुट पक्षी मृत्यूमुखी पडत आहेत. जिल्हा व तालुका पशुसंवर्धन विभागाने याची तत्काळ दखल घेऊन सर्वेक्षणाचे काम हाती घेतले असून मृत पक्षांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेकडे पाठवले असून त्याचे निष्कर्ष अद्याप आले नाही. खबरदारीची उपाययोजना म्हणून जिल्हाधिकारी दिपक मुगळीकर यांनी शुक्रवारी (ता.आठ) सायंकाळी एक आदेश निर्गमीत केला आहे. मुरुंबा परिसरात कोंबड्या मृत झाल्याचे आढळल्या असून मृतकीच्या कारणाचे निष्कर्ष अद्याप येणे बाकी आहेत. या रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून मुरूंबा येथे सर्वेक्षणाचे काम पुर्ण होईपर्यंत कुक्कुट पक्षांची खरेदी, विक्री, वाहतूक, बाजार व जत्रा, प्रदर्शन व पशुपक्षांची आवगमनास प्रतिबंध घालण्यात आले. 

हेही वाचा - सेलूच्या उपजिल्हा रुग्णालयाचा कायापालट; डाॅ. संजय हरबडे यांची कामगिरी

महापालिकेने बंदी लावणे आवश्यक 
शहरात विविध हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणात चिकन मागवले जाते तसेच शेकडो नागरिक देखील आहारामध्ये चिकन, अंडी आदीचा वापर करतात. परभणीत आजूबाजूच्या खेड्यापाड्यातून देखील हे पक्षी पुरवले जातात. त्यामुळे शहरात देखील ह्या पक्षांच्या खरेदी-विक्रीवर काही काळ महापालिकेने बंदी लावणे आवश्यक आहे. परंतू, पालिकेने अजूनही याबाबत कोणताही निर्णय घेतल्याचे दिसून आले नाही. 

हेही वाचा - हिंगोलीत कोरोना लसीची रंगीत तालिम पुर्ण 

सॅम्पल पुण्याला पाठवले 
मुरूंबा येथील एका फॉर्मवर गुरुवारी व शुक्रवारी (ता.आठ) जवळपास आठशे पक्षी मृत्युमुखी पडले आहेत. ते पक्षी कुठल्या आजाराने मृत्यूमुखी पडले याची शहानिशा करण्यासाठी सॅम्पल पुण्याला पाठवले आहेत. तरी अशा घटना कुठे आढळून आल्यास नागरिकांनी नजिकच्या पशु वैद्यकीय अधिकारी कार्यालयाकडे संपर्क साधावा. 
- श्री.लोणे, जिल्हा पशु संवर्धन अधिकारी, परभणी

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bapare, eight hundred hens die in two days, type at Murumba, Parbhani News