बापूसाहेब गोरठेकरांचा ‘राष्ट्रवादी’ला रामराम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

राष्ट्रवादी ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करीत सोमवारी (ता. २९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोरठेकरांनी भूमिका जाहीर केली.

नांदेड - राष्ट्रवादी ग्रामीण विभागाचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार बापूसाहेब देशमुख गोरठेकर यांनी स्थानिक नेतृत्वावर गंभीर आरोप करीत सोमवारी (ता. २९) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकला. जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती दत्तात्रय रेड्डी यांच्या निवासस्थानी झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत गोरठेकरांनी भूमिका जाहीर केली. 

लोकसभा निवडणुकीनंतर भाजपचे खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याशी जवळीक साधत पक्षकार्यापासून अलिप्त राहिलेले राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष गोरठेकर यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांची बैठक घेतली.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर गोरठेकर यांच्या राजकीय भूमिकेकडे जिल्ह्याचे लक्ष होते. गोरठेकरांची खासदार चिखलीकरांशी जवळीक वाढल्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. मधल्या काळात त्यांनी पक्षकार्यापासून दुरावा साधला होता. लोकसभा निवडणुकीत गोरठेकरांनी आघाडी धर्म पाळला नसल्याच्या आमदार अमिता चव्हाण यांच्या आरोपावर उत्तर देताना गोरठेकर म्हणाले, ‘इमाने-इतबारे पक्षाचे काम केले. याउलट माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यामुळे मला दोनवेळा पराभव पचवावा लागला. ज्येष्ठ नेते शंकरराव चव्हाण यांच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी जिल्हा परिषदेअंतर्गत दलित वस्तीच्या निधीला न्यायालयातून स्टे आणला. लोकांना विकास हवा आहे. विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या नेतृत्वाला मतदार साथ देत असल्याने जय-पराजय लिखित असतो.’

‘काही करा; पण आमदार व्हा’ असा सल्ला फोनद्वारे कार्यकर्ते देत आहेत, असे सांगून कुठल्याही पक्षाकडून तूर्तास ऑफर आलेली नाही; पण लवकरच पुढची भूमिका जाहीर करणार असल्याचेही गोरठेकर म्हणाले. 

शरद पवार यांच्यावर निष्ठा
जिल्ह्यातील अहिरावण-महिरावणच्या जोडीने ‘राष्ट्रवादी’ची वाट लावल्याचा टोलाही आमदार प्रदीप नाईक आणि माजी आमदार शंकरअण्णा धोंडगे यांचे नाव न घेता श्री. गोरठेकरांनी लगावला. जिल्ह्यातील या राहू-केतूच्या जोडगोळीला वैतागून पक्ष सोडत असलो तरी ‘राष्ट्रवादी’चे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर निष्ठा असल्याचे गोरठेकर यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bapusaheb Gorthekar Resign to NCP Party Politics