
लातूर : जिल्ह्यातून बाहेरच्या जिल्ह्यांत तसेच राज्यांत जाण्यासाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तिसऱ्या दिवशी अर्जांची संख्या दहा हजारांपर्यंत पोचली. यात उत्तर प्रदेशमध्ये जाण्यासाठी सर्वाधिक दीड हजार जणांनी अर्ज केले आहेत. या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेचे प्रयत्न जिल्हा प्रशासनाने सुरू केले आहेत. जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांच्या मार्गदर्शनाखाली या रेल्वेचे नियोजन सुरू असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी जीवन देसाई यांनी दिली.
टाळेबंदीमुळे अडकून पडलेल्यांना त्यांच्या गावी जाण्यासाठी सरकारने परवानगी दिल्यानंतर मोठ्या संख्येने लोकांनी जिल्हा प्रशासनाकडे अर्ज करण्यास सुरवात केली आहे. तीन दिवसांत सोमवारी सायंकाळपर्यंत नऊ हजार ७५८ लोकांचे अर्ज आले असून यापैकी चार हजार ५२७ लोकांनी महाराष्ट्रातच अन्य जिल्ह्यांत जाण्यासाठी अर्ज केले आहेत. सर्वाधिक पाच हजार २३१ अर्ज बाहेरील राज्यांत जाण्यासाठी आले आहेत. अर्जानुसार यादी करून संबंधित जिल्हा प्रशासनाची संमती घेण्यात येत आहे.
विविध राज्यांत वेगवेगळी प्रक्रिया असून त्याप्रमाणे अर्जदारांची माहिती पाठवण्यात येत आहे. यात संमती येण्याचे प्रमाणही वाढले असून त्यानुसार लोकांना जाण्याच्या तयारीसाठी आरोग्य तपासणी व वाहन उपलब्ध करण्याबाबत सूचना दिल्या आहेत. दरम्यान, एकाच राज्यात मोठ्या संख्येने जाणाऱ्यांसाठी विशेष रेल्वेची सुविधा देण्याचे प्रयत्न आहेत. यात जिल्ह्यातून उत्तर प्रदेशमध्ये जाणाऱ्यांची संख्या एक हजार ४७३ आहे. या प्रवाशांसाठी विशेष रेल्वेचे नियोजन सुरू असल्याचे श्री. देसाई यांनी सांगितले. उत्तर प्रदेशनंतर आसाममध्ये जाण्यासाठी ७३३, राजस्थान - ६२६, आंध्र प्रदेश - ५१७, मध्य प्रदेश - ४२६ व कर्नाटकमध्ये जाण्यासाठी ४४५ प्रवाशांनी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले.
सहाशे विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी
दरम्यान, परजिल्हा व परराज्यांत जाण्यासाठी तयार असलेल्या शहरातील सहाशे विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणी सोमवारी आरोग्य विभागाने बार्शी रस्त्यावरील विश्वकर्मा गार्डनमध्ये केली. तपासणीनंतर विद्यार्थ्यांना आरोग्य प्रमाणपत्र देण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. गंगाधर परगे यांनी दिली. गंगापूर आरोग्य केंद्राच्या पाच डॉक्टरांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही तपासणी केली. यावेळी तहसीलदार स्वप्नील पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अशोक सारडा यांच्यासह वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तेलंगणाचे विद्यार्थी पाठवणार
शहरात तेलंगणा राज्यातील १८० विद्यार्थी असून या विद्यार्थ्यांना मंगळवारी (ता. पाच) त्यांच्या गावी पाठवण्याचे नियोजन सुरू आहे. या विषयावर बस ट्रॅव्हल्सच्या मालकांसोबत सोमवारी चर्चा करण्यात आली. विद्यार्थ्यांची गावी जाण्यासाठी भाडे देण्याची तयारी आहे. त्यानुसार वाहतुकीचे मार्ग तयार केले जात आहेत. या विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली आहे. यामुळे हे विद्यार्थी मंगळवारी रवाना होण्याची शक्यता तहसीलदार स्वप्नील पवार यांनी व्यक्त केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.