
बीड : गर्भपात-सोनोग्राफी केंद्रांची आता धडक तपासणी
बीड : जिल्ह्यातील सर्व गर्भपात केंद्र आणि सोनोग्राफी केंद्रांची कसून तपासणी होणार असून औषधी दुकानांचीही तपासणी केली जाणार आहे. तपासणीत गर्भपात केंद्रांमध्ये आणि सोनोग्राफी केंद्रांत चुकीचे प्रकार आढळले तर आणि डॉक्टरांच्या प्रिस्क्रीप्शन शिवाय गर्भपाताची औषधे विक्री केल्याचे आढळलेल्या दुकानांवर कडक कारवाई केली जाणार आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश साबळे यांनी शुक्रवारी सर्व उपजिल्हा रुग्णालये आणि ग्रामीण रुग्णालयांच्या वैद्यकीय अधीक्षकांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, सहाय्यक आयुक्त (अन्न) यांना औषधी दुकाने तपासणीच्या सूचना केल्या आहेत. दुकानांतून विना प्रिस्क्रीप्शन गर्भपात औषधांची विक्री केल्याचे आढळल्यास गुन्हा दाखल करण्याचेही पत्रात नमूद करण्यात आले आहे.
शीतल ऊर्फ सीताबाई गणेश गाडे या महिलेचे गर्भलिंगनिदानानंतर गर्भपात करताना अति रक्तस्त्रावामुळे मृत्यूच्या घटनेला दोन महिनेही लोटत नाहीत तोच परळी शहरात मंगळवारी बेकायदा गर्भलिंगनिदान करुन महिलेच्या गर्भाचे तुकडे करुन पात केल्याचे समोर आले. मात्र, मागच्या काळात प्रशासन हातावर हात ठेऊन बसल्याने ‘सकाळ’ने यावर विशेष वृत्त प्रसिद्ध करत प्रकाश टाकला. बुधवारच्या अंकात ‘गर्भ डॉक्टरने कापला; पण ‘पात’ प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे’ या वृत्ताची आरोग्य संचालकांनी दखल घेतली. जिल्हा शल्यचिकित्सकांना जिल्ह्यातील सोनोग्राफी केंद्र व गर्भपात केंद्रांची तपासणी मोहीम राबविण्याच्या सूचना या वृत्तानंतर दिल्या आहेत.
दरम्यान, शीतल गाडे हिच्या बेकायदा गर्भपातामुळे मृत्यूनंतर तपासातील त्रूटी, आणि मागच्या काळात महसूल, पोलिस व आरोग्य विभागाने केलेल्या दुर्लक्षामुळेच असे प्रकार करणाऱ्यांवर जरब राहीला नाही. त्यामुळे या दोन घटना उघड झाल्या असल्या तरी अशा किती घटना घडत असतील, यावर ‘सकाळ’ने प्रकाश टाकला होता. दरम्यान, एखाद्या गर्भपात केंद्रात १२ आठवड्यांपुढील गर्भपात केल्याचे समोर आल्यानंतर त्याच्यावर कारवाईचा प्रस्ताव तत्काळ जिल्हा शल्यचिकित्सकांना पाठवायचा आहे. या तपासणीसाठी वैद्यकीय अधीक्षकांच्या स्तरावर पथके नेमायची आहेत.
तालुकानिहाय सोनोग्राफी व गर्भपात केंद्र
(दोन्ही संख्या शासकीय व खासगीसह)
तालुका - सोनोग्राफी केंद्र - गर्भपात केंद्र.
बीड -७६ - ४४
परळी - १२ - १५
अंबाजोगाई - २९ - १६
माजलगाव - १६ - ०८
धारुर - दोन - चार
गेवराई - १० - ०७
आष्टी - ११ - सात
केज - सात - आठ
पाटोदा - दोन - चार
शिरुर कासार - दोन - एक
वडवणी - एक - एक
औषधी दुकानांना धाक ना दरारा
सहाय्यक आयुक्त (औषधे), अन्न व औषधी प्रशासनाच्या अखत्यारीत येणाऱ्या औषधी दुकानांवर अलीकडे कुठलाही धाक ना दरारा असे चित्र आहे. या विभागाचा कारभार म्हणजे उंटावरुन शेळ्या आणि वार्षिक तपासणी व नूतनीकरण तसेच परवान्यावेळी दुकानचालकांकडून कागदपत्रांसोबत ‘विशिष्ट पुर्तता’ असाच आहे. त्यामुळे अलीकडे दुकानांतून नियमित गोळ्या - औषधांसह अगदी गर्भपातासाठीची औषधेही बिनदिक्कत विक्री केली जातात. त्यामुळेच जिल्ह्यात अशा घटना घडत आहेत. आता जिल्हा शल्यचिकित्सकांच्या सूचनेनंतर काय कारवाई होते, हे पाहणे महत्वाचे आहे.
९९ गर्भपात तर १५३ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी
जिल्ह्यात २४२ सोनाग्राफी केंद्रांना आरोग्य विभागाने मान्यता दिली. मात्र, यातील यातील ४७ केंद्रांची मान्यता कायमची रद्द करण्यात आली आहे. मागच्या मोहिमेवेळी तपासणीत अनियमितता आणि काही डॉक्टरांचे स्थलांतर यामुळे सदर केंद्र कायमचे बंद आहेत. तर, यातील २४ सोनोग्राफी केंद्र तात्पुरती बंद आहेत. उर्वरित १६८ केंद्रांपैकी १५ सोनोग्राफी केंद्र जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, अंबाजोगाईचे स्वाराती व ग्रामीण रुग्णालयातील आहेत. शासकीय सोडता १५३ सोनोग्राफी केंद्रांची तपासणी केली जाणार आहे. तसेच, जिल्ह्यात ११५ शासनमान्य गर्भपात केंद्र असून यातील १६ शासकीय आहेत. उर्वरित ९९ केंद्रांची तपासणी केली जाणार आहे.
बेकायदा गर्भलिंगनिदान व गर्भपाताच्या घटना चिंताजनक आणि जिल्ह्यासाठी अपमानास्पद आहेत. घटनेनंतर पोलिसांसह आरोग्य विभागानेही अशा मंडळींवर कारवाई केली आहे. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी सोनोग्राफी केंद्र, गर्भपात केंद्र आणि औषधी दुकानांची विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. यात गैरप्रकार आढळल्यास कडक कारवाई आणि फौजदारी गुन्हेही नोंद करण्यात येतील.
- डॉ. सुरेश साबळे, जिल्हा शल्यचिकित्सक, बीड.
Web Title: Beed Abortion Sonography Centers Strike Action Against Medical Shops Drugs Without Prescription
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..