अर्ध्यावरती डाव मोडला... अपघातात पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

सकाळ ऑनलाईन टीम
Sunday, 10 January 2021

अपघातात दुचाकीवरील त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत

आष्टी (जि.बीड) :  पीकअपने दिलेल्या जोराच्या धडकेत दुचाकीवरील कुक्कुटपालक व्यावसायिक कानिफ भीमराव वांढरे हे जागीच ठार झाले. या अपघातात दुचाकीवरील त्यांची पत्नी व मुलगी गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. शुक्रवारी (ता. आठ) रात्री 11 वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील पोखरी गावाजवळ हा अपघात झाला.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भीमराव वांढरे (वय 38 वर्षे, रा. पांढरी) यांचा पोखरी येथे कुकुटपालन व्यवसाय आहे. शुक्रवारी रात्री वांढरे हे पत्नी सोनाली (वय ३० वर्षे) आणि मुलगी संस्कृती ( वय नऊ वर्षे) यांच्यासह दुचाकीने (क्रमांक एमएच23 एपी5180) पांढरी येथून पोखरी येथे जात होते. पोखरी गावाजवळ असलेल्या उतारावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या पिकअपने (क्रमांक एमएच14 व्ही9019) त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात कानिफ वांढरे हे जागीच ठार झाले.

पीककर्ज वाटप घोटाळ्याप्रकरणी ऐन ग्रामपंचायतीच्या धामधूमीत गुन्हे दाखल; विरोधकांना फायदा

अपघाताची माहिती समजताच परिसरातील ग्रामस्थ व नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत गंभीर जखमी झालेल्या सोनाली वांढरे व संस्कृती वांढरे यांना उपचारासाठी नगर येथे दाखल केले. मृत कानिफ वांढरे यांच्यावर पांढरी येथे आज (ता. नऊ) दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला असून रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. पुढील तपास सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पोलिस हवालदार संजय गुजर हे करीत आहेत.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: beed accident news husband dead wife injured