बीड : बिंदुसरा नदीपात्राला पुराचा धोका

ओढ्यांवरही अतिक्रमण : प्रशासनाची बघ्याची भूमिका
Beed Bindusara river basin Construction collapsed danger of flood
Beed Bindusara river basin Construction collapsed danger of floodsakal

बीड : शहरातील लहान नद्या, ओढे भूमाफियांनी अगोदरच गिळंकृत केले आहेत. आता माफियांकडून शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीपात्राच्या पूररेषेच्या आतच बांधकामांचा सपाटा सुरु आहे. सत्ताधारी, राजकीय मंडळींचे माफियांसोबत हितसंबंध असल्याने प्रशासनानेही बघ्याची भूमिका घेतली आहे. मात्र, यामुळे भविष्यात पुराचा धोका आहे.

बिंदुसरा नदी, करपरा नदी, नदीपात्रातील ओढे, नाले यांच्यावर भूमाफियांनी केलेल्या अतिक्रमण प्रकरणी नगरपरिषद बीड, नगररचनाकार, भूमिअभिलेख, जलसंपदा विभाग कार्यालयातील संगनमत असलेल्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. शहरातील अनेक ओढ्यांवर अतिक्रमणे करून बांधकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे शहराला अनेकदा पुराचा तडाखाही बसला आहे.

आता तर बिंदुसरा नदीपात्राच्या पूररेषेत संरक्षण भिंती उभारून बांधकामे केली जात आहेत. शहराच्या उत्तरेकडे असे प्रकार मोठ्या प्रमाणावर सुरु आहेत. या प्रकाराकडे संबंधित विभाग जाणीवपूर्वक डोळेझाक करत आहे. तर, नगरपालिकेसह इतर सत्ताधाऱ्यांचेच हस्तक भूमाफिया असल्याने त्यांचे पाठबळ असल्याचा आरोप विभागीय आयुक्तांना दिलेल्या निवेदनात करण्यात आला.

जाणीवपूर्वक सर्वेक्षण टाळले असून यामुळे रेडफ्लड लाईन व ब्लू फ्लड लाईन हा पट्टा ठरविण्यात आलेला नाही. शहरातून जाणाऱ्या करपरा नदीला लागून पाठीमागील बाजूस नदीच्या सुरक्षा भिंतीजवळ बांधकामे सुरु आहेत. यात परवाना देणाऱ्या नगरपालिका प्रशासनातील संबंधितांवर कारवाईची मागणीही करण्यात आली आहे. बिंदुसरा नदी व करपरा नदी या दोन्ही नद्यांच्या दोन्ही बाजूने काही ठिकाणी सुरक्षा भिंत बांधलेली आहे.

ती कोणत्या आधारावर बांधण्यात आली? त्यासाठी सर्वेक्षण केले होते का? असा सवाल करत रेड फ्लड लाईन व ब्ल्यू फ्लड लाईन हा पट्टा ठरवलेलाच नसताना कोणत्या मोजमाप आधारे सुरक्षा भिंत बांधण्यात आली? तसेच सुरक्षा भिंतीचा आधार घेऊन नदीकाठचे सुरक्षा भिंतीपर्यंत अतिक्रमण करतात. त्यामुळेच अतिक्रमणाचे प्रमाण वाढल्याचा आरोप करण्यात आला आहे. जलसंपदा विभागात शहरातून जाणाऱ्या बिंदुसरा नदी, करपरा नदी व सिंदफणा नद्यांची कोणतीही माहिती उपलब्ध नाही.

जमीन हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा

नदी-नाले, ओढे यांच्यावर निगा राखण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची असून सर्वेक्षण करून देखभाल करणे त्यांची जबाबदारी असताना आर्थिक लाभातून जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याबद्दल संबंधित दोषींवर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी. आनंदवाडी सर्व्हे नंबर २०२ मधील सरवळा नामक ओढा पूर्णपणे भूमाफियांनी गिळंकृत करत बुजवला आहे. प्लॉटींग करून जमीन हडप करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून नैसर्गिक ओढा मोकळा करण्यात यावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. गणेश ढवळे यांनी केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com