
बीड/आष्टी/अंबाजोगाई : उद्या शुक्रवारपासून (ता.२६) ता. चार एप्रिलपर्यंत लागू केलेल्या लॉकडाऊनला भाजपने विरोध सुरु केला आहे. व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहणार असून कायदेभंगचा इशारा आमदार सुरेश धसांनी दिला आहे. जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच आता शेकडा प्रमाणातही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्याला भाजपकडून प्रखर विरोध सुरु झाला.
ज्या भागात मोठ्या प्रमाणावर रुग्ण आहेत ते भाग सील करा, सरसकट लॉकडाऊन करू नका, आष्टी तालुका हा कष्टकरी, कामगार, ऊसतोड कामगारांचा आहे. हातावर पोट असणार्यांचा आहे. येथील व्यापारी लॉकडाऊनमध्ये सहभागी होणार नाहीत.संविनय कायदे भंगाचे गुन्हे दाखल झाले तरी मागे हटणार नाहीत. आपण व्यापाऱ्यांच्या पाठीशी राहू असेही श्री.धस म्हणाले.
या भागात ८५ ते ९० टक्के लोकांचे पोट हातावर आहे. अवती-भोवती नगर जिल्ह्यातील सर्व गावे, शहरे सुरू राहणार आहेत. त्यात एकटा आष्टी तालुका हा बंद राहणार आहे. त्याचे गंभीर परिणाम सर्व व्यापार्यांना आणि सर्व व्यवस्थेवर होणार असल्याचेही श्री.धस म्हणाले. व्यापाऱ्यांसह त्यांनी आष्टीच्या तहसिलदारांना निवेदन दिले.
जनसामान्यांची कोंडी रोखण्यासाठी पुनर्विचार करा : आमदार मुंदडा
वाढती महागाई, बाजारपेठेतील आर्थिक मंदी यामुळे अगोदरच सामान्य नागरिक आर्थिक कोंडीत सापडला आहे. अशा स्थितीत लॉकडाऊन करणे सामान्य माणसांना परवडणारे नाही. शासनाने कडक निर्बंध घालून नागरिकांना शिस्त लावावी. सामान्यांची आर्थिक कोंडी रोखण्यासाठी लॉकडाऊन बाबत पुनर्विचार करावा, अशी मागणी आमदार नमिता मुंदडा यांनी केली. गेल्या अनेक दिवसांपासुन कोरोना रूग्णांची संख्या वाढत चालली आहे. उपचार व उपाय योजनांत वाढ करावी, लॉकडाऊनच्या नावाखाली नागरिकांना वेठीस धरू नये. अनेकांचे उदरनिर्वाह दैनंदिन रोजंदारीवर आहेत. शेतकर्यांचा भाजीपाला दररोज बाजारात येतो. दुकानावर हॉटेल, टपर्या इथे काम करणारे मजुर दररोजच्या रोजनदारीवर असतात. त्यामुळे त्यांच्या उदरनिर्वाहाचा मोठा प्रश्न भेडसावणारा आहे. रिक्षाचालक, छोटे वाहन चालक यांचे व्यवसाय अगोदरच चालत नाहीत. व्यवसाय मंदावल्याने त्यांचे कर्जाचे हप्ते थकीत आहेत. बारा बलुतेदार, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते व रस्त्यावरील विविध वस्तुंची विक्री करणारे विक्रेते यांचे व्यवसाय अडचणीत येतील. केज मतदार संघात केज, नेकनुर परिसरातून दररोज खवा मोठ्या प्रमाणात पुणे, मुंबई या ठिकाणी जातो. जिल्हा बंदीमुळे हा व्यवसाय बंद पडेल, असेही श्रीमती मुंदडा म्हणाल्या.
पवारांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
गेवराईचे आमदार लक्ष्मण पवार यांनी गुरुवारी जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांची भेट घेतली. दहा ऐवजी चार ते पाच दिवस लॉकडाऊन असावा, शेतकर्यांसह व्यापार्यांना शिथीलता द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. समवेत सुशील जवंजाळ, राजेंद्र राक्षसभुवनकर आदी उपस्थित होते. थकीत वीज देयकामुळे तोडलेल्या जोडण्या जोडण्याची मागणीही त्यांनी केली.
संपादन - गणेश पिटेकर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.