esakal | होऊ द्या खर्च; कोरोनातली उधळपट्टी
sakal

बोलून बातमी शोधा

corona sakal

मागच्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी कोरोना विषाणू संसर्गाची लागण सुरु झाली आणि सर्व देश लॉकडाऊनमुळे घरात बसला

होऊ द्या खर्च; कोरोनातली उधळपट्टी

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड: मागच्या वर्षी मार्च महिन्याच्या शेवटी कोरोना विषाणू संसर्गाची लागण सुरु झाली आणि सर्व देश लॉकडाऊनमुळे घरात बसला. पण, या काळात शासन निधीवर डल्ला मारणारी यंत्रणा अगदी सजग होती. कोरोना विषाणू संसर्गावरील रुग्णांच्या उपचारासाठी आवश्यक व्हेंटीलेटर्स, औषधींचा पुरवठा करणाऱ्या शासनाने कंत्राटी तत्वार भरलेल्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांचे वेतनही अदा केले. तरीही बीड जिल्ह्यात या काळात ५८ कोटी ८८ लाख रुपयांचा खर्च झाला आहे.

रंगरंगोट्या, दुरुस्त्या, सीसीटीव्ही, विद्युतीकरण अशा कामांच्या नावाखाली कोट्यावधी रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे. केलेल्या खर्चाची कोरोना उपचारात खरंच गरज होती का, असा प्रश्न पडत आहे. विशेष म्हणजे यातील खर्च केलेल्या अनेक बाबी कागदोपत्री आणि अनेक बाबींच्या किंमती अव्वाच्या सव्वा लावल्याचेही आकड्यांवरुन दिसत आहे. विशेष म्हणजे उधळपट्टी करण्यात कोणत्याच विभागाने हात आखडलेला नाही.

प्राध्यापकाला सहा लाखांचा आॅनलाईन गंडा, उमरगा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

कोरोना विषाणू संसर्गावरील उपचारासाठी सर्वात महत्वाचे ऑक्सीजन लाईन, व्हेंटीलेटर्स आणि रॅमडीसेव्हर इंजेक्शन ही घटक आहेत. तर, प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मास्क, सॅनिटायझर आवश्यक आहे. विशेष म्हणजे सर्वात खर्चिक व्हेंटीलेटर्स आणि रॅमडिसेव्हर ही इंजेक्शनचा आणि इतर आवश्यक औषधींचा पुरवठा तर शासन स्तरावरुनच झाला आहे. उपचारातील केवळ ऑक्सीजन लाईन टाकण्याचा खर्च स्थानिक पातळीवर करण्यात आला. पण, सुरुवातीलाच सॅनिटायझर, मास्क आणि पिपीई किट व ऑक्सीपल्समिटर व थर्मल गनच्या खरेदीसाठी कोट्यावधी रुपयांचा खर्च करण्यात आला.

विशेष म्हणजे याच्या किंमती पाहून कोणाचेही डोळे चक्रावतील. रंगरंगोटी, दुरुस्ती, विद्युतीकरण आणि सीसीटीव्ही यांच्या खर्चाचे आकडे आणि किंमती पाहूनही सज्ञानी लोकांना चक्कर आल्यावाचून राहणार नाही. मग, यंत्रणेने पैशांची उधळपट्टी केली कि यंत्रणेला हाती धरुन सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांनी शासन तिजोरीवर हात सफाई केली असा प्रश्न पडत आहे.

जिल्ह्यातील वरिष्ठ महाविद्यालये सोमवारपासून सुरु 

नव्या इमारती तरीही दुरुस्ती अन् विद्युतीकरण-
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या रुग्णांवरील उपचारासाठी विविध ठिकाणी कोविड हॉस्पीटल्स व कोविड केअर सेंटर्स उभारण्यात आले. विशेष म्हणजे यातील अनेक सेंटर्स हे दवाखान्यांतच होते. म्हणजे सदरील इमारती नियमित वापरातील होत्या. तरीही विद्युतीकरण व दुरुस्तींवर कोट्यावधींचा खर्च झाला आहे. विशेष म्हणजे बांधकाम विभागाने पूर्ण केलेल्या काही इमारतींचे केवळ हस्तांतरण करणे बाकी असतानाही पुन्हा दुरुस्तीच्या नावाखाली लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आली आहे.

जनता घरात; डल्लेकरी सजग
दरम्यान, कोरोना विषाणूचा संसर्ग सुरु झाल्यानंतर लॉकडाऊन लागले आणि सामान्य जनता घरात कोंडली गेली. या काळात कोरोना विषाणू संसर्गाच्या नावाखाली शासनानेही निधीला सढळ हात सोडलेला होता. फक्त कुठे आणि कशाच्या नावाखाली खर्च करायचा याचेच डोके लावायचे होते. सर्वजण घरात असताना तिजोरीवर डल्ला मारणारी यंत्रणा मात्र सजग होती. मग त्यांनीच खर्च करण्याची ठिकाणे शोधली, अंदाजपत्रके केली, यंत्रणेला हाताशी धरुन त्याला मंजूऱ्याही मिळविल्या आणि टेंडर पदरात पाडून घेतले. विशेष म्हणजे सत्ताधाऱ्यांपैकीही काही मोजक्याच लोकांच्या जवळच्या मंडळींच्या हाती अधिक मलिदा पडला आहे. सत्ताधाऱ्यांपैकीही अनेकांचे हात कोरडेच आहेत. 

एक बॉम्ब फुटला; हळुहळु स्फोट होणार    
दरम्यान, कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात लोक भितीच्या सावटाखाली होते. बाहेरच्या जगता काय चाललेय याचीही लोकांना काही माहिती नव्हती. या काळात यंत्रणेला हाताशी धरुन निधीची उधळपट्टी करण्यात आली. याच काळात केज व अंबाजोगाईच्या रुग्णालयांत बसविलेल्या सीसीटीव्हीवरुन भाजप आमदार नमिता मुंदडा यांनी किंमतीवरुन गंभीर आरोप केले आहेत. त्यापुढे जाऊन चारच महिन्यांपूर्वी बसविलेले सीसीटीव्हीच सुरु नसल्याचे अधिकाऱ्यांच्या पत्रावरुनच समोर आले आहे. म्हणजे या काळातील अनेक वस्तू गरज नसताना आणि अवस्ताव किंमतीने खरेदी केल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर, चारच महिन्यांत एखादी यंत्रणा बंद असल्याचे समोर आल्याने इतर यंत्रणेचे काय असाही प्रश्न आहे. मुंदडांनी एक बॉम्ब फोडला आहे, आता हळुहळु मोठ - मोठे स्फोट होण्याचा अंदाज आहे. 

सर्जाराजाची जोडी लयभारी! लातुरातील नळेगाव येथील बाजारात मिळाला सोन्याचा भाव

या शिर्षांखाली भेटला कोरोनासाठी निधी
- जिल्हा वार्षिक योजना : ४९ कोटी ५० लाख.
- आमदारांचा स्थानिक विकास निधी : एक कोटी २५ लाख.
- गौण खनिज प्रतिष्ठान : तीन कोटी २२ लाख.
- आपत्ती निवारण विभाग : चार कोटी ८६ लाख.

(edited by- pramod sarawale)