
बीडचे जिल्हाधिकारी थेट गोदापात्रात
बीड : अगोदर वाळू घाटांचे लिलाव नसताना वाळू चोरी व आता लिलावानंतर क्षमतेपेक्षा अधिक उत्खनन, अधिक वाळूची वाहतूक असे प्रकार घडत आहेत. अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने उपाययोजना हाती घेतल्या आहेत. पथकांच्या नेमणुकीनंतर शनिवारी खुद्द जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा देखील गोदापात्रात उतरले. गुंतेगाव (ता. गेवराई) येथील वाळू घाटावरून वाळू वाहतूक करणाऱ्या हायवाचालकाकडे पावती नसल्याने हा हायवा जप्त करून गेवराई तहसील कार्यालयात आणण्यात आला.
गेल्या आठवड्यात गेवराईचे भाजप आमदार लक्ष्मण पवार यांनी वाळू घाटांवरून परवानगीपेक्षा अधिक वाळूचे उत्खनन, वाहनांना जीपीएस नाही, अधिक क्षमतेने वाळू वाहतूक अशा विविध मुद्द्यांवरून उपोषण केले होते. त्यानंतर प्रशासनाने व विशेषत: जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी या विषयात लक्ष घातले आहे. अवैध वाळू उपसा व वाहतूक रोखण्यासाठी सहायक पोलिस अधीक्षक पंकज कुमावत व अपर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांची नोडल अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली असून तहसीलदारांची दोन भरारी पथकेही नियुक्त केली आहेत. तसेच जिल्ह्यातील १६ चेकनाक्यांवर महसूल, पोलिस अशी एकूण ३१ खड्या पथकांची नेमणुकीचे आदेशही जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी गुरुवारीच पारीत केले.
दरम्यान, शनिवारी खुद्द श्री. शर्मा यांनी गुंतेगाव सावळेश्वर (ता. गेवराई) व म्हाळसपिंपळगाव या वाळू घाटांना भेटी देऊन पाहणी केली. गुंतेगाव येथून वाळू भरुन जाणाऱ्या हायवाकडे पावती नसल्याने ते जप्त करण्यात आले. तर, या घाटासह इतर दोन्ही घाटांवरील सीसीटीव्ही फुटेज, पावत्या, रजिस्टर यांचीही जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली.
अवैध वाळूउपसा, बोटीवर कारवाई
औराद शहाजानी : अनेक दिवसांपासू्न वाळू माफियांनी सीमाभागात धुमाकूळ घातलेला आहे. यावर कारवाई करण्यासाठी महसूल विभाग व पोलिस प्रशासनाच्यावतीने आज सायंकाळी महाराष्ट्र-कर्नाटक सिमेच्या लगत असलेल्या ते मांजरा नदीच्या पात्रात अवैध मार्गाने वाळू उपसा करणाऱ्या बोटीवर कारवाई करण्यात आली. ही अवैध वाळू उपसा करणारी बोट ताब्यात घेऊन त्या बोटीला नष्ट करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत चालू होती. या कारवाईत निलंग्याचे तहसीलदार गणेश जाधव औरादचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कामत, तलाठी बालाजी भोसले, विशाल कांचे पोलिस कर्मचारी श्रीनिवास चिटकवणे, गोपाळ बर्डे, आदींनी सहभाग घेतला.
मंजरथमध्ये दोन कोटींचा मुद्देमाल जप्त
पाथरी ः नियमबाह्य व मोठ्या यंत्राच्या साहाय्याने वाळू उपसा होत असलेल्या तालुक्यातील मंजरथ वाळू धक्यावर परभणी पोलिसांनी कारवाई करत शनिवारी सकाळी तब्बल दोन कोटी २७ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात दोन पोकलेन, दोन हायवा, तीन बोट, तीन टिप्पर जप्त केले. ठेकेदारासह ३३ जणांवर गुन्हा नोंद केला. कारवाई फत्ते करण्यासाठी पोलिसांनी गनिमीकावा केला. वाळू वाहतूक करणाऱ्या मोठ्या हायवात बसून पोलिस धक्क्यावर पोहचले अन् कारवाई केली.
Web Title: Beed Collector Inspection On Sand Transportation Godavari Basin
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..