पैशासमोर लाचारी! माजलगावच्या उपजिल्हाधिकाऱ्यासह चालकाला न्यायालयाने सुनावली पोलिस कोठडी

कमलेश जाब्रस
Friday, 19 February 2021

एका वाळु व्यापाऱ्याच्या तक्रारीवर हा सापळा रचण्यात आला होता.

माजलगाव (जि. बीड) : वाळुची गाडी चालु देण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी माजलगावचे उपजिल्हाधिकारी श्रीकांत गायकवाड याच्यासह चालक लक्ष्मण तात्यासाहेब काळे यास सोमवारपर्यंत (ता. २२)  पोलिस कोठडी सुनावली आहे. तालुक्यातील सिंदफणा व गोदावरी नदीपात्रातुन मोठ्या प्रमाणावर वाळुचा उपसा बोटीच्या साहाय्याने करण्यात येतो. वाळूमाफिया रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत महसुल व पोलिस प्रशासनाच्या लागेबांध्यातुन वाळू चोरी करत होते.

या वाळूचोरांवर कारवाई होणे अपेक्षित असतांनाही पैशाच्या हव्यासापोटी अधिकारी लाचेची मागणी करत होते. याबाबत केलेल्या तक्रारीवरून माजलगावात ही मोठे कारवाई करण्यात आली आहे. गुरूवारी (ता.१८) जालना येथील एसीबीने माजलगावात सापळा रचुन श्रीकांत गायकवाड आणि त्याचा चालक लक्ष्मण काळे यास अटक केले होते. एका वाळु व्यापाऱ्याच्या तक्रारीवर हा सापळा रचण्यात आला होता. उपजिल्हाधिकारी गायकवाड यांच्यासाठी 65 हजार रूपयांची लाच घेताना चालकास पकडण्यात आले होते. त्यानंतर गायकवाड यांना अटक करण्यात आली होती. या प्रकरणी दोघानांही न्यायालयासमोर हजर केले असता न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी दोघानांही तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

 

संपादन - गणेश पिटेकर

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Crime News Majalgaon Deputy Collector Get Three Days Police Custody