
Beed : घरकुलाच्या जागेसाठी उपोषण करणाऱ्याचा मृत्यू
बीड : शबरी योजनेअंतर्गत मिळालेल्या घरकुलासाठी जागेची मागणी करत उपोषण करणाऱ्या कुटुंबातील एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. चार) पहाटे समोर आली. अप्पाराव भुजंग पवार (वय ५५, रा. वासनवाडी, ता. बीड) असे या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या पत्नी कविता पवार यांच्या नावे शबरी योजनेतून घरकुल मंजूर झाले होते. या घरकुलासाठी वासनवाडी शिवारातील सर्व्हे क्रमांक १६६/अ मधील जागेची मागणी पवार कुटुंबीयांकडून मागील साडेचार वर्षांपासून होती. यासाठी या कुटुंबीयांनी यापूर्वीही अनेक वेळा उपोषणे केली.
यापूर्वी याच मागणीसाठी उपोषण करणाऱ्या अप्पाराव पवार यांची मुलगी साखरबाई यांची याच ठिकाणी प्रसूती झाली होती. दरम्यान, शनिवारी (ता. तीन) कविता पवार, अप्पाराव पवार व इतरांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरु केले. शनिवारी पहाटे अप्पाराव पवार यांचा उपोषणस्थळी मृत्यू झाला. त्यानंतर कुटुंबातील लोकांनी एकच आक्रोश केला. दरम्यान, शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. जिल्हा रुग्णालयात मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.