बीड : अखेर धारूर घाटाचे होणार रुंदीकरण

हालचालींना वेग : राज्य रस्ते विकास महामंडळाची न्हाईला सूचना
Beed Dharur Ghat Widening
Beed Dharur Ghat Wideningsakal

किल्लेधारूर : शहरातून राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी. गेला आहे. हा रस्ता पालखी महामार्ग म्हणून संबोधिला जातो. शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक ते धुनकवाड पाटी दरम्यानचा बारा किलोमीटर अंतरातील अरुंद रस्ता, धोकादायक घाट, वळणांचे रुंदीकरणाचे काम प्रस्तावित करून पूर्ण करण्याची सूचना महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांनी औरंगाबाद येथील राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (न्हाई) अधीक्षक अभियंत्यांना केली आहे. हा रस्ता रस्ते अपघातांना कारणीभूत ठरत असल्याचे सकाळ प्रशासनाच्या लक्षात आणून दिले होते. या वृत्ताची दखल आणि दाखला महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या अधीक्षकांनी आपल्या पत्रात दिलेला आहे.

राष्टीय महामार्ग झाल्याने शैक्षणिक, आर्थिकदृष्ट्या मागास व डोंगराळ असलेल्या या भागात दळणवळणाची सोय होऊन विकासाच्या वेगात वाढ झाली. १२ किलोमीटर अरुंद अंतराच्या रस्त्यावर अपघातांची मालिका सुरू असून अनेकांना जीव गमवावा लागला आहे. दुसऱ्या टप्प्यात बाह्य वळण रस्ता असल्याने रस्ता जसा अगोदर आहे तसाच ठेऊन फक्त डांबरीकरण करून वाहनांसाठी सुरू करण्यात आला. मात्र रस्ता अरुंद असल्याने मोठे अपघात आहेत. याचे रुंदीकरण व्हावे यासाठी ता.४ जून रोजी दैनिक सकाळने ‘अरुंद वाट ठरतेय मरण वाट’ या मथळ्याखाली विशेष वृत्त प्रसिद्ध करून नागरी समस्या चव्हाट्यावर आणली होती.

या वृत्ताची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांनी औरंगाबादेतील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अधीक्षक अभियंत्यांना दूरध्वनीद्वारे सूचना केली होती. त्यानुसार आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाच्या औरंगाबाद येथील अधीक्षक अभियंत्यांनी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या (सा.बां) अधीक्षक अभियंत्यांना ता.९ रोजी पत्र पाठवून, खामगाव-पंढरपूर राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी वरील इतर कामांसह धारूर घाटातील काम पूर्ण करून ते राज्य रस्ते विकास महामंडळाला हस्तांतरित करावे अशी सूचना केलेली आहे. शिवाय यापुढे ‘राज्य रस्ते विकास’कडून राष्ट्रीय महामार्गाचे कोणतेही नवीन काम केले जाणार नसल्याने थेटेगव्हाण-चोरंबा रस्त्याच्या दरम्यान रुंदीकरणासह घाटसुधारणा कामे प्रस्तावित करून पूर्ण करावे अशी सूचना करण्यात आली आहे.

राष्ट्रीय महामार्ग ५४८ सी मुळे उत्तर भारत व दक्षिण भारतातील अंतर दोनशे किलोमीटरने कमी होण्यासोबत वेळ, पैसा, श्रम व इंधनात मोठ्या प्रमाणात बचत होत आहे. काही प्रमाणात रोजगार निर्माण होऊन विकासाचा वेगही वाढला आहे. १२ किलोमीटरच्या अंतरात अडीच किलोमीटरचा अरुंद, तीव्र उताराचा व वळणाचा घाट आहे. त्यामुळेच भविष्यात बाह्यवळण रस्त्याचे नियोजन आहे. मात्र रस्त्यावरील दोन हजाराहून अधिक झाडांची कत्तल करून रस्ता जसा होता तसाच ठेऊन फक्त डांबर ओतून दुरुस्त करून वाहनांसाठी सुरू करण्यात आला. रस्ता व घाट अरुंद असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अपघात होऊन जीवित हानी झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com