बीड जिल्ह्यात कोरोनाचे तीन नवे रुग्ण, एक जण आला मुंबईहून, दुसरा संपर्कात

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

एक जण बीड शहरातील पालवण चाकातील राहणारा असून, तो मुंबईहून आला होता. लक्षणे जाणवून लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात गेला होता. वडवणी येथील कोरोनाग्रस्त हा पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता.

बीड - प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा आदर्श पॅटर्न राबवत मागचे दोन महिने कोरोना शून्य असलेल्या जिल्ह्यात मुंबईहून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढतच आहे. शनिवारी (ता. २३) पुन्हा नवीन तीन कोरोना रुग्ण आढळल्याने जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या ४१ झाली आहे. 

मागच्या महिन्यात पिंपळा (ता. आष्टी) येथे जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण आढळला. नगर येथे तपासणी व उपचारानंतर तो बरा झाला. त्यानंतर दीड महिना जिल्हा कोरोना शून्यच होता. दरम्यान, मागच्या शनिवारी (ता. १६) पहिल्यांदा दोन आणि दुसऱ्याच दिवशी सात रुग्ण आढळले. त्यानंतर चार दिवसांपूर्वी एकाच दिवशी १३ कोरोना रुग्ण आढळून आले. अशाप्रकारे जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी उशिरापर्यंत ३८ वर पोचली होती. त्यात शनिवारी पाठविलेल्या ४२ थ्रोट नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला. यात तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. जिल्ह्याची कोरोना रुग्णांची संख्या आता ४१ वर पोचली. दरम्यान, एका महिलेचा मृत्यू झाला असून सहाजण पुण्याला उपचाराला गेले आहेत. 

हेही वाचा -परजिल्ह्यात मुलीचे लग्न लावून बीड जिल्ह्यात आले

बीड, वडवणी व कुंडीचे एकेक 
दरम्यान, शनिवारी आढळलेले रुग्ण वडवणी, बीड व कुंडी (ता. धारूर) येथील आहेत. वरील तिन्ही ठिकाणी यापूर्वी रुग्ण आढळलेले आहेत. एक जण बीड शहरातील पालवण चाकातील राहणारा असून, तो मुंबईहून आला होता. लक्षणे जाणवून लागल्याने तो जिल्हा रुग्णालयात गेला होता. वडवणी येथील कोरोनाग्रस्त हा पहिल्या पॉझिटीव्ह रुग्णाच्या संपर्कात आला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Beed district, three new corona patients, one from Mumbai, came in contact

Tags
टॉपिकस
Topic Tags: