परजिल्ह्यात मुलीचे लग्न लावून बीड जिल्ह्यात आले, पाचजणांवर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 23 May 2020

विनापरवाना लग्न लावून परत गावात आल्यानंतर ग्रामसेवकाने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले; परंतु त्यासाठी त्यांनी नकार दिला. यामुळे ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून मुलीच्या वडिलांसह पाचजणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

माजलगाव (जि. बीड) - मुलीचे नगर जिल्ह्यात विनापरवाना लग्न लावून परत गावात आल्यानंतर ग्रामसेवकाने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले; परंतु त्यासाठी त्यांनी नकार दिला. यामुळे ग्रामसेवकाच्या फिर्यादीवरून मुलीच्या वडिलांसह पाचजणांवर दिंद्रुड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना लोणगाव (ता. माजलगाव) येथे घडली.

लोणगाव (ता. माजलगाव) येथील युवराज निंबाळकर यांच्या मुलीचा विवाह चार दिवसांपूर्वी अहमदनगर येथे विनापरवाना करण्यात आला. या लग्नासाठी युवराज निंबाळकर, शेषेराव निंबाळकर, शिवराज निंबाळकर, मीरा निंबाळकर, अलका निंबाळकर हे नगर जिल्ह्यात गेले होते. तेथे लग्न लावून गावाकडे परतले.

ही वाचा - शेती, शेतकरी आणि कोरोना....असे बदललेय ग्रामीण जीवन  

सर्वजण हे परजिल्ह्यात जाऊन आल्याने सध्या सुरू असलेला साथीचा रोग सुरू असताना सर्वजण विनामास्क लावून गावात फिरत होते. यामुळे ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकाने त्यांना रीतसर पास काढून तुम्ही गेला होतात का, असे विचारले. त्यांनी विनापरवाना गेल्याचे सांगितल्याने त्यांना क्वारंटाइन होण्यास सांगितले होते परंतु यासाठी सर्वांनीच नकार देत विरोध केला. यामुळे ग्रामसेवक सुहास गायकवाड यांनी दिंद्रुड पोलिस ठाण्यात जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश डावलल्याच्या दिलेल्या फिर्यादीवरून वरील सर्व पाच जणांविरुद्ध शुक्रवारी (ता.२२) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He came to Beed district after marrying a girl in the district and a case was registered against five persons