बीड जिल्ह्याचा विकासनिधी इतरत्र जाऊ देणार नाही - धनंजय मुंडे

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 5 April 2020

जिल्ह्याच्या हक्काच्या विकासकामांच्या बाबतीत एक रुपयाही इतरत्र वळवू देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी अधिकचा निधी खेचून आणण्याची आपली भूमिका व क्षमता आहे, असे धनंजय मुंडे म्हणाले.

परळी वैजनाथ (जि. बीड) - बीड जिल्ह्यातील मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचा निधीच काय, जिल्ह्याच्या हक्काचा कोणत्याही विकासकामांचा निधी इतरत्र कोठेही जाऊ दिला जाणार नाही. त्यासाठी टोकाची भूमिका घेऊ, असे पालकमंत्री धनंजय मुंडे म्हणाले. 

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतील १०८ कोटी रुपयांची जिल्ह्यातील ३४ रस्ताकामे रद्द करण्याचा निर्णय नुकताच ग्रामविकास विभागाने घेतला. यावर भाजपने जोरदार टीकास्त्र सोडले होते. यावर श्री. मुंडे यांनी आपली भूमिका मांडली आहे. जिल्ह्याच्या हक्काच्या विकासकामांच्या बाबतीत एक रुपयाही इतरत्र वळवू देण्याचा प्रश्नच येत नाही. उलट जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्यासाठी अधिकचा निधी खेचून आणण्याची आपली भूमिका व क्षमता आहे.

हेही वाचा -  ‘हे’ माध्यम आहे एकाग्रता वाढविण्यासाठी झक्कास, कोणते? ते वाचाच   

सध्या आपले प्राधान्य फक्त जिल्ह्याला कोरोनाच्या प्रादुर्भावापासून वाचविणे हे आहे. दुर्दैवाने हे संकट आलेच तर त्याला मात देण्यासाठी सक्षम आरोग्य यंत्रणा तयार ठेवणे हे आहे. जिल्ह्याच्या विकासासाठी कोणतीही तडजोड करण्यात येणार नाही, त्यासाठी टोकाची भूमिका घेण्यासही आपण मागेपुढे पाहणार नाही, असे धनंजय मुंडे म्हणाले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed district's development fund will not go anywhere - Dhananjay Munde