Beed नगर रोडवर कारवाई; बाजारपेठांमध्ये कधी? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Beed
बीडमध्ये अतिक्रमणाने रहदारीस अडथळे, शासकीय इमारतींच्या भिंती तोडूनही अतिक्रमणे

Beed : नगर रोडवर कारवाई; बाजारपेठांमध्ये कधी?

बीड : अतिक्रमणे करून व्यवसाय आणि त्यानंतर अतिक्रमण हटविण्याची मोहीम म्हणजे पाठशिवणीचा खेळ आहे. सोमवारी पुन्हा एकदा नगर रोडवरील अतिक्रमणे हटविण्यात आली आहेत. मात्र, सुभाष रोडसह इतर बाजारपेठांची ठिकाणे व शहरातील अनेक शासकीय कार्यालयांना पडलेला अतिक्रमणांचा विळखा कधी सुटणार? असा प्रश्न आहे.

नगर रोड हा वर्दळीचा भाग आहे. जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा नगर रोडवरील अतिक्रमणे हटविले; बाजारपेठांतही गरज न्यायालय, प्रशासकीय इमारतीसह अनेक शासकीय कार्यालये या रस्त्यावर आहेत. मात्र, रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी पादचारी वाटा अतिक्रमणांनी व्यापल्या आहेत.

काही तात्पुरती शेड तर काही ठिकाणी लोखंडी टपऱ्या टाकून व्यवसाय थाटलेले आहेत. त्यामुळे रहदारीस मोठा अडथळा निर्माण होतो. अतिक्रमणे हटविण्याची आणि पुन्हा चार दिवसांनी अतिक्रमण हा पाठशिवणीचा खेळ कायम आहे.

दरम्यान, सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तिकडे सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा शासकीय रस्ता हद्दीतील अतिक्रमणे पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या साहाय्याने हटविण्यात आली. यात हातावर पोट असणाऱ्या आणि आज या गावाहून उद्या दुसऱ्या गावांत भटकंती करणाऱ्या कामगारांचीही अतिक्रमणे हटविण्यात आली.

बाजारपेठा - शासकीय इमारतीही विळख्यात

प्रमुख बाजारपेठा, अनेक सरकारी कार्यालयांच्या इमारतीही अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. आरोग्य विभागाची मोक्याच्या जागेवरील जिल्हा प्रशिक्षण केंद्राच्या इमारतीची संरक्षण भिंत तोडून अतिक्रमणे झाली आहेत. एसटी महामंडळाची मोक्याची जागाही अतिक्रमणाच्या विळख्यात आहे. सुभाष रोडवर तर अतिक्रमण करून व्यावसायिक पेठच उभारली आहे.

यामुळे रहदारीस अडथळा येत आहे. न्यायालयात प्रकरण असल्याचे दाखवून अतिक्रमित दुकानदार महिन्याकाठी २० हजारांचे भाडे दुकानदारांकडून वसूल करतात. नवीन भाजी मंडईत देखील तात्पुरत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक व रहदारीस अडथळा होत आहे. या अतिक्रमणांवर कारवाई गरजेची आहे.