
‘मध्य गोदावरी’ चे पाणी गेवराई मतदारसंघाला मिळणार
बीड : मध्य गोदावरी उपखोऱ्यातील पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराई तालुक्यातील ११ प्रकल्पांचा समावेश करावा, असे निर्देश जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिले. यासाठी माजी आमदार अमरसिंह पंडित यांचा याबाबत पाठपुरावा सुरु आहे. श्री. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली, त्यात त्यांनी हे निर्देश दिले.
मध्य गोदावरी नदीच्या उपखोऱ्यातील हक्काचे पाणी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळावे म्हणून अनेक दिवसांपासून पाठपुरावा सुरु असल्याचे श्री. पंडित म्हणाले. तत्कालीन भाजप सरकारच्या काळात लवादाकडून पाणी उपलब्ध होवू शकले नाही. मात्र जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या माध्यमातून लवादाकडून १९.२८ टीएमसी पाणी मध्य गोदावरी नदीच्या उपखोऱ्यात उपलब्ध झाले. मात्र काही जाचक अटींमुळे गेवराई तालुका या पाणी वापरापासून वंचित होता, असेही श्री. पंडित म्हणाले. हक्काचे पाणी मिळावे यासाठी या जाचक अटी शिथिल करण्याची मागणी अनेक दिवसांपासून शासनाकडे केली.
याबाबत बुधवारी जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झालेल्या बैठकीमध्ये याबाबत सविस्तर चर्चा झाली. बैठकीला अमरसिंह पंडित यांच्यासह पालकमंत्री धनंजय मुंडे, आमदार संजय दौंड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष महेबुब शेख, जिल्हाध्यक्ष अॅड. राजेश्वर चव्हाण यांच्यासह जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आग्रह धरला.
मारफळा, वाघदरा, अर्धमसला, तांदळा, भाटेपुरी, जातेगाव, सिरसदेवी, पौळाचीवाडी, चकलांबा, पाचेगाव व माटेगाव या अकरा ठिकाणी साठवण तलाव मंजूर करावेत. गोदावरी नदीपात्रातील पाणी बंद नलिकेद्वारे सिंदफणा नदीपात्रात सोडून सिंदफणा आणि गोदावरी नद्यांच्या खोऱ्यांच्या मधोमध भौगोलिक उंचवट्याचा योग्य वापर करून नवीन कालवा प्रस्तावित करण्याची मागणीही माजी अमरसिंह पंडित यांनी केली. या नवीन कालव्यामुळे यापूर्वीचे सर्व प्रकल्प व जुन्या सिंचन योजनांमध्ये पाणी सोडणे शक्य होणार आहे. त्यामुळे गेवराई विधानसभा मतदार संघात हरितक्रांती होईल असेही पंडित यांनी सांगितले.
पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा
जलसंपदा मंत्री जयंत पाटील याप्रकरणी अभ्यास करून अहवाल सादर करण्याचे निर्देश उपस्थित अधिकाऱ्यांना देवून पाणी वापराच्या बृहत आराखड्यात गेवराईचा समावेश करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. त्यामुळे मध्य गोदावरीच्या उपखोऱ्यातील पाणी गेवराई विधानसभा मतदार संघाला मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
Web Title: Beed Godavari Water Supply To 11 Projects In Gevrai Taluka Jayant Patil Order
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..