
- रुग्ण नसताना कोरोनाच्या नावाखाली खर्च
- डेमो नाही, यंत्रणाही ताब्यात दिली नसताना दिले देयक
- कोट्यावधी खर्च करुनही यंत्रणा बंदच
बीड: कोरोना विषाणू संसर्गाच्या काळात अख्ख जग ठप्प असताना कोरोनाच्या नावाखाली निधीची उधळपट्टी करणारी आणि त्यावर डल्ला मारणारी यंत्रणा मात्र कार्यान्वित असल्याचे झालेल्या खर्चांच्या आकड्यांवरुन दिसते. उपचाराची ऐसी तैसी असलेल्या जिल्ह्यात दुरुस्ती, रंगरंगोटी, गरज नसताना खरेद्या आणि वस्तूंचे दरही अव्वाच्या सव्वा असे एकेक प्रकार आता समोर येत आहेत. अशीच सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठीही दिड कोटींची उधळपट्टी झाली आहे.
विशेष म्हणजे ज्या आरोग्य संस्थांचा आणि कोरोना उपचाराचा संबंध नव्हता अशा ठिकाणीही कोरोनाच्या नावाखाली सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. त्याहून गंभीर म्हणजे सीसीटीव्ही यंत्रणा बसवून उणापुरा महिनाही उलटलेला नसताना ही यंत्रणाच बंद असल्याचे समोर आले आहे. सीसीटीव्ही यंत्रणा खरेदीसाठी ठरविलेला दरही अव्वाच्या सव्वा आहे. संबंधीत ठेकेदाराने आरोग्य यंत्रणेला ना डेमो दिला नाही ना यंत्रणा ताब्यात दिली नाही तरीही देयके अदा केल्याचा अफलातून प्रकार समोर आला आहे. हा सर्व प्रकार नेमका कोणाच्या हितासाठी झाला असा प्रश्न आहे. यंत्रणेचा उपयोग आणि गरजच नसताना कोरोनाच्या नावाखाली झालेल्या उधळपट्टीतील हा दुसरा अध्याय समोर आला आहे.
औसा - तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार...
कोरोना रुग्णच नाहीत तरी खर्च
दरम्यान, अंबाजोगाईच्या स्वारातीमधील विषाणू संसर्ग तपासणी प्रयोगशाळा व कोविड वार्ड, बीडचे जिल्हा रुग्णालय, लोखंडी (ता. अंबाजोगाईचे) वृद्धव मानसिक आजार केंद्र, लोखंडीचे स्त्री रुग्णालय, लोखंडीचे एएनएम परिचारिका प्रशिक्षण केंद्र, केजचे ग्रामीण रुग्णालय, परळीचे उपजिल्हा रुग्णालय, आष्टीचे ग्रामीण रुग्णालय व तेलगावच्या (ता. माजलगाव) ट्रामा केअर सेंटरमध्ये कोरोना नावाखाली सीसीटीव्ही यंत्रणा बसविण्यात आली.
विशेष म्हणजे सदर यंत्रणेचे टेंडर हे ऑक्टोबर महिन्यात निघाले आणि नोव्हेंबर - डिसेंबर महिन्यात कामाला सुरुवात झाली. त्यावेळी केजच्या उपजिल्हा रुग्णालयाचा आणि कोरोना रुग्णांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नव्हता. कारण, यानंतर परिसरातीलच पिसेगाव येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतीगृहात कोविड केअर सेंटर सुरु झाले आणि रुग्ण तिथे शरिक केले जाऊ लागले. तर, परळीच्या उपजिल्हा रुग्णायातही सुरुवातीला मे महिन्याच्या अखेरीस दोन रुग्ण आले आणि त्यांना जुनच्या पहिल्या आठवड्यात सुटी दिली गेली. तर, तेलगावच्या ट्रामा केअर सेंटरमध्ये तर कोरोनाच सोडा नेमके उपचार तरी काय होतात हे आरोग्य विभागालाच सांगता येणार नाही. तरीही अशा ठिकाणी कोरेानाच्या नावाखाली सीसीटीव्हीवर ही उधळपट्टी करण्यात आली आहे.
‘वंदे मातरम्, भारत माता की जय’च्या घोषणा देत साश्रू नयनांनी ग्रामस्थांनी दिला...
रुग्ण तडफडल्याचे पहायचे होते का?
उपचार भेटत नाहीत, डॉक्टर परिचारिका येत नाहीत, साधने नाहीत अशी ओरड सुरुवातीपासून होती. जेवायला वेळेवर नाही आणि आलेलेही निकृष्ट असते अशी सुरुवातीपासून ओरड होती. सीसीटीव्हीतून नेमकी ही तडफड पहायची होती का, असा प्रश्न आहे. शासकीय यंत्रणेने कोणाच्या हितासाठी हा उठाठेव केला, असा प्रश्न आहे.
किंमतीही कैक पटीने
दरम्यान, यंत्रणेची गरज आणि किंमती हा संशोधनाचा विषय ठरला आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात सीसीटीव्हीसाठी २५ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. वास्तविक ही यंत्रणा उभी करायला तीन लाख रुपये पुरेसे असल्याचा दावा केजच्या आमदार नमिता मुंदडा यांचा आहे. या प्रकरणी त्यांनी जिल्हा नियोजन समिती आणि शासनाकडेही तक्रार केली आहे. या ठिकाणी ४७ कॅमेरे, सहा स्पिकर्स व दोन टिव्ही बसविले आहेत. कॅमेऱ्यांची किंमत साधारण दोन - तीन हजारांच्या आसपास असताना अशी उधळपट्टी करुन नेमके कोणाचे खिशे भरले असा प्रश्न आहे.
जळकोटात पुन्हा कोरोनाची 'एंट्री', दोन शिक्षक आणि दोन प्राध्यापकांना...
यंत्रणाच सुरु नाही; सीसीटीव्ही आहेत का?
यात गंभीर प्रकार म्हणजे याची गरज होती का हा संशोधनाचा विषय असून किंमतही भरमसाठ आहे. त्यातही आता यंत्रणा तरी जागेवर आहे का, असा प्रश्न आहे. केजच्या उपजिल्हा रुग्णालयात डिसेंबरमध्ये बसविलेल्या यंत्रणेतून काहीच दिसत नाही (कार्यान्वित नाही) असे पत्र उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षकांनी जानेवारी महिन्यात जिल्हा शल्यचिकीत्सकांना दिले आहे. म्हणजे एका महिन्यात खराब होणारी यंत्रणा किती दर्जेदार असेल हे सहज लक्षात येईल. गंभीर म्हणजे ठेकेदाराने अधिकाऱ्यांना यंत्रणेचा डेमोही दिला नाही आणि रितसर यंत्रणाही हस्तांतरीत केलेली नसताना देयक अदा करण्यात आले आहे. केजच्या अधीक्षकांनी सीसीटीव्ही बंद असल्याचे पत्र धाडून महिना लोटत आला तरी अद्यापही त्यावर पुढे पाने हललेली नाहीत.
असा झाला सीसीटीव्हीवर खर्च
रुग्णालय | रक्कम | |
१ | स्वाराती व्हीडीआरएल लॅब, अंबाजोगाई | सहा लाख ६७ हजार |
२ | जिल्हा रुग्णालय, बीड | २५ लाख ९५ हजार |
३ | वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र, लोखंडी सावरगाव | ११ लाख ७५ हजार |
४ | स्त्री रुग्णालय, लोखंडी सावरगाव | १३ लाख ६४ हजार |
५ | एएनएम प्रशिक्षण केंद्र, लोखंडी सावरगाव | ८ लाख ६९ हजार |
६ | उपजिल्हा रुग्णालय, केज | २५ लाख ०२ हजार |
७ | उपजिल्हा रुग्णालय, परळी | २३ लाख ६६ हजार |
८ | ग्रामीण रुग्णालय, आष्टी | २१ लाख ३१ हजार |
९ | ट्रामा केअर सेंटर, तेलगाव | १० लाख १७ हजार |
(edited by- pramod sarawale)