केज-अंबाजोगाई महामार्गावर शिवशाही बसच्या धडकेत वृद्ध महिलेचा मृत्यू

रामदास साबळे
Tuesday, 2 February 2021

अपघातानंतर बसचालकाने ही बस केज पोलीस ठाण्यात नेऊन दाखल केली

केज (बीड): भरधाव वेगाने जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही बसने मंगळवार (ता.०२) रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एका वृद्ध महिलेला जोराची धडक दिली. हा अपघात केज-अंबाजोगाई महामार्गावर उपजिल्हा रूग्णालयाच्या समोर घडला. या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव श्रीमती काशीबाई रामभाऊ थोरात (वय-७३) असल्याची माहिती आहे.

तालुक्यातील बनकरंजा येथील श्रीमती काशीबाई थोरात या श्रावण बाळ योजनेची पगार उचलण्यासाठी शहरात आल्या होत्या. मात्र तब्येत थोडी खराब असल्याने उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाणार होत्या. मात्र याचवेळी भरधाव वेगाने अंबाजोगाईहून बीडकडे जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या शिवशाही (एमएच-०९/एफएल-१०४२) बसने त्यांना जोराची धडक दिली. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

शहरातील रस्ते भुयारी गटारीसाठी खोदल्याने चिमुकल्यांनी नगरपरिषेदेलाच बनवले...

अपघातानंतर बसचालकाने ही बस केज पोलीस ठाण्यात नेऊन दाखल केली. उपजिल्हा रूग्णालयाच्या समोरील रस्त्याचे काम झाले आहे; त्यातच याठिकाणी रस्त्यावर उतार असल्याने वाहने भरधाव वेगात असतात. सतत रूग्णालयातून रूग्णांचे नातेवाईक रस्ता ओलांडून औषधी व चहा नाष्ट्यासाठी मेडीकल व हाॅटेलवर ये-जा करतात. मात्र अशा रहदारीच्या ठिकाणी रस्त्यावर गतीरोधक बसविण्याची आवश्यकता असताना रस्ता काम करणाऱ्या संबंधीत कंपनीने दुर्लक्ष केल्याने अपघात घडण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे उपजिल्हा रुग्णालयासमोरील मुख्य रस्त्यावर गतीरोधक बसविण्याची मागणी केली जात आहे.

(edited by- pramod sarawale)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed latest news Elderly woman dies in Shivshahi bus accident