esakal | ऑफलाईन परीक्षार्थींचे भवितव्य अधांतरी, ‘लॉकडाऊन’मुळे होऊ शकते अडचण

बोलून बातमी शोधा

exam

कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने आज दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला

ऑफलाईन परीक्षार्थींचे भवितव्य अधांतरी, ‘लॉकडाऊन’मुळे होऊ शकते अडचण
sakal_logo
By
अनिरुद्ध धर्माधिकारी

आष्टी (बीड): कोरोनाचा प्रादूर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने राज्य सरकारने आज दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. परंतु सध्या विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन व ऑफलाईनही परीक्षा सुरू आहेत. या विद्यार्थ्यांचे काही पेपर झाले आहेत. यापुढे लॉकडाऊन लागल्यास परीक्षा कशी द्यायची असा मोठा प्रश्न ऑफलाईन पद्धतीने परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांपुढे उभा राहणार आहे.

राज्यात कोरोना प्रादूर्भावामुळे मागील वर्षीपासून विविध अभ्यासक्रमांच्या ऑनलाईन परीक्षा घेण्याची पद्धत सुरू झाली. मागील वर्षीप्रमाणेच यावर्षीही कोरोनाची दुसरी लाट सध्या सुरू असल्याने विद्यार्थ्यांचे भवितव्य सलग दुसर्‍या वर्षीही कोरोनामुळे अधांतरी आहे. सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने व्यावसायिकसह विविध अभ्यासक्रमांच्या पदवी परीक्षा सुरू आहेत. या परीक्षांचे फॉर्म भरतानाच विद्यार्थ्यांना ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन पर्याय देण्यात आलेले होते. त्यानुसार अनेक विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

Corona virus| वैद्यकीय शाखेच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी

सध्या विद्यापीठाकडून गेल्या आठवड्यापासून परीक्षा घेण्यात येत आहेत. ऑफलाईन अर्ज भरलेले विद्यार्थ्यांची संख्याही मोठी आहे. ऑफलाईन परीक्षा ‘होम सेंटर’वर सुरू आहेत. अनेक विषयांची परीक्षा पार पडली आहे. त्यात ऑनलाईन विद्यार्थी घरून परीक्षा देत असले तरी ऑफलाईनच्या विद्यार्थ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे.

अशातच आता राज्यात कडक लॉकडाऊन लागू करण्याच्या हालचाली सुरू आहेत. तसे झाल्यास सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व जिल्हा बंदी होऊ शकते. त्यामुळे परजिल्ह्यातून येऊन परीक्षा देणार्‍या विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे.

थरार! सहा वर्षीय शौर्यला सोडवण्यासाठी पोलिसांना विकावी लागली पाणीपुरी...

परीक्षा देण्यासाठी धावाधाव
ज्यांच्याकडे मोबाईल, लॅपटॉप, कॉम्प्युटर व सर्वांत महत्त्वाचे म्हणजे वीज व इंटरनेटची रेंज अशी व्यवस्था होणे शक्य नाही, त्यांनी ऑफलाईन परीक्षा देण्यास पसंती दिलेली आहे. यात बहुतांश विद्यार्थी ग्रामीण भागातील आहेत. परंतु परीक्षा  सुरू झाल्यावर लगेच राज्यात 30 एप्रिलपर्यंत लॉकडाऊन लागले. त्यातून परीक्षार्थींना वगळले असले तरी वेळेत परीक्षा केंद्रावर पोहचण्यासाठी विद्यार्थ्यांना मोठी धावाधाव करावी लागत आहे. एसटी बसच्या फेर्‍या निम्म्यावर आलेल्या असून, रिक्षा मिळणेही मुश्कील झाले आहे. शिवाय रिक्षाभाड्यात वाढ झाल्याने मोठा भुर्दंड या विद्यार्थ्यांना सहन करावा लागत आहे.

विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी घेतली कोरोना लस

परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी
ऑफलाईन पद्धतीने होणार्‍या दहावी-बारावीच्या परीक्षा शासनाने पुढे ढकलल्या. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला. त्याचप्रमाणे सध्या सुर असलेल्या सर्व प्रकारच्या परीक्षाही पुढे ढकलण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून होत आहे. एप्रिलअखेर किंवा मेच्या पहिल्या-दुसर्‍या आठवड्यात होणार्‍या परीक्षा यंदा कोरोनाचा उद्रेक झालेला असताना एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच सुरू झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. सध्याची परिस्थिती पाहता विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थी-शिक्षकांच्या आरोग्याची काळजी म्हणून परीक्षा पुढे ढकलण्याची गरज व्यक्त होत आहे.