दुर्दैवी! हातपाय धुण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय कार्तिकचा पाण्यात बुडून मृत्यू

भास्कर सोळंके
Saturday, 6 March 2021

कार्तिक याचे वडील अक्रुर चव्हाण हे पुणे शहरात कंपनीत कामाला असल्याने दोघे पती- पत्नी हे पुणे येथे स्थायिक होते

जातेगाव (बीड): उजव्या कालव्यातील रॅमवर हातपाय धुण्यासाठी गेलेल्या सहा वर्षीय बालकाचा पाय घसरून पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना शुक्रवारी जातेगावात घडली. 

कार्तिक अक्रुर चव्हाण असे बुडून मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. शुक्रवार (ता ५) दुपारी चार वाजण्याच्या सुमारास  काही मुलांसोबत कालव्याजवळ आला होता. कालव्यात पाणी असल्याने तो हात पाय धुण्यासाठी रॅमवरुन पाण्यात उतरला मात्र, अचानक त्याचा पाय घसरून पाण्यात वाहू लागला. कार्तिक पाटाच्या  पाण्यात वाहून गेला याची माहिती सोबत असलेल्या मुलांनी त्याच्या आजीला घरी जाऊन दिली.

धक्कादायक! उस्मानाबाद शहराजवळ बिबट्याचा गूढ मृत्यू; परिसरात खळबळ

शुक्रवारी चार वाजता कार्तिक कालव्याच्या पाण्यात वाहून गेल्यामुळे ग्रामस्थांनी त्याच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. रात्र झाल्याने शनिवार (ता ६) सकाळी ग्रामस्थांनी पुन्हा शोध सुरू केला असताना घटना झालेल्या काही अंतरावर कार्तिकचा मृतदेह सापडला.

जातेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करुन अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान कार्तिक याचे वडील अक्रुर चव्हाण हे पुणे शहरात कंपनीत कामाला असल्याने दोघे पती- पत्नी हे पुणे येथे स्थायिक होते. कार्तिक हा आजीकडे राहत होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed latest news Six year old Karthik who went to wash drowned in water