esakal | धनंजय मुंडे तळ ठोकून, पंकजा मुंडेही दाखल; बीड जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान
sakal

बोलून बातमी शोधा

Pankaja And Dhananjay Munde News

सेवा सोसायटी मतदारसंघाची निवडणुक व्हावी यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात भाजपने विभागीय सहनिबंधक, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राज्यपालापर्यंत केलेले प्रयत्न फोल ठरले.

धनंजय मुंडे तळ ठोकून, पंकजा मुंडेही दाखल; बीड जिल्हा बँकेसाठी उद्या मतदान

sakal_logo
By
दत्ता देशमुख

बीड : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आठ संचालकांच्या निवडीसाठी शनिवारी (ता.२०) मतदान होणार आहे. पालकमंत्री धनंजय मुंडे तळ ठोकून असून शुक्रवारी (ता.१९) भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडेही शहरात डेरेदाखल झाल्या आहेत. कोण काय डावपेच आखणार आणि कोणाला धोबीपछाड बसणार हे दोन दिवसांत कळणार आहे. बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या १९ संचालकांच्या निवडीसाठी निवडणुक जाहीर झाली. मात्र, तांत्रिक कारणांनी सेवा सोसायटीच्या ११ मतदारसंघातील सर्वच उमेदवारी अर्ज बाद झाल्याने केवळ सात मतदारसंघाच्या आठ जागांसाठी आता निवडणुक होत आहे.

सेवा सोसायटी मतदारसंघाची निवडणुक व्हावी यासाठी निवडणुक निर्णय अधिकाऱ्यांच्या निकालाविरोधात भाजपने विभागीय सहनिबंधक, उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय आणि राज्यपालापर्यंत केलेले प्रयत्न फोल ठरले. अखेर रद्द झालेल्या ११ जागांच्या निवडणुका राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडणार असल्याचे मानले जाते. बँकेवर असलेले भाजपचे प्रभुत्व कमी करण्यासाठी राष्ट्रवादीने आखडलेले डावपेच सध्या तरी सवासे ठरत आहेत. दरम्यान, सदर संचालक मंडळ अल्पकाळाचे ठरणार असल्याचे मानले जात असले तरीही निवडणुक रंगतदार अवस्थेत आली आहे.


राष्ट्रवादीच्या पुढाकाराने महाविकास आघाडीचे स्वतंत्र, भाजपचे स्वतंत्र आणि विशेष म्हणजे शिवसेनेचेही स्वतंत्र पॅनल रिंगणात आहे. गुरुवारी (ता.१८) पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आघाडीच्या उमेदवारांचा आमदार प्रकाश सोळंके, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, शिवसेना जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, उषा दराडे, सय्यद सलिम, प्रा. सुशिला मोराळे आदी प्रमुख नेत्यांशी परिचय करुन देण्यात आला. आपण प्रत्येक निवडणुक ताकदीने लढवितो असा विश्वास त्यांनी उमेदवारांना दिला. पण, या आघाडीला आठ जागांसाठी केवळ सहा उमेदवार रिंगणात उतरविता आले आहेत.

दुसरीकडे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडेही शुक्रवारी शहरात पोचल्या आहेत. त्यांनीही आमदार सुरेश धस, अक्षय मुंदडा, बँकेचे माजी अध्यक्ष सुभाष सारडा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के आदींसोबत बैठक घेतली आहे. दरम्यान, बँकेच्या निवडणुकीत पॅनलमध्ये कोणीही उमेदवार असले तरी प्रमुख नेत्यांनी आपापल्या सोयीने इकडच्या - तिकडच्या उमेदवारांसाठी फिल्डींग टाईट केली आहे. अपक्षांमधीलही काही उमेदवारांनी तगडे आव्हान उभे केले आहे. आज दिवसभर घडणाऱ्या घडमोडी, उद्याचे मतदान आणि निकालाकडे लक्ष लागले आहे.

संपादन - गणेश पिटेकर

loading image