शनिवार म्हणून आजोबा नातीसह हनुमान दर्शनाला निघाले, मात्र वाटेतच असं काय घडलं की; सर्वत्र व्यक्त केली जातेय हळहळ

टीम ई सकाळ
Sunday, 14 February 2021

किमया देशमुख ही औरंगाबाद येथील असून ती काही दिवसांपूर्वी आपल्या आजोबाकडे आली होती.

बीड : शहरातून जाणाऱ्या कंटनेरने दुचाकीला धडक दिल्यामुळे दुचाकीवरील एका नऊ वर्षाच्या मुलीचा चाकाखाली येऊन मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (ता.१३) शहरातील राष्ट्रवादी भवन जवळ घडली. आजोबांसोबत शनिवारी म्हणून वायभाटवाडी येथे हनुमान दर्शनाला जात असलेल्या नातीवर काळाने घाला घातला. कंटेनर चालकास पोलिसांनी ताब्यात घेतले.

उध्दव भानूदास चंदनशिव (रा. मित्रनगर, बीड) हे शनिवारी (ता. १३) सकाळी त्यांच्या दुचाकीने वायभटवाडी येथे हनुमान मंदिरात दर्शनासाठी जात होते. त्यांच्यासोबत त्यांची नऊ वर्षीय नात किमया अमर देशमुख होती. राष्ट्रवादी भवनासमोर त्यांच्या दुचाकीला इंदौरहून बीडकडे येणाऱ्या कंटेनरने धडक दिली. यात दुचाकीच्या पाठीमागे बसलेली किमया देशमुख ही कंटेनरच्या पाठीमागील टायरखाली आली. त्यात ती जागीच ठार झाली.

या घटनेने हळहळ व्यक्त केली जात असून घटनास्थळी येऊन पोलिसांनी कंटेनर चालकाला ताब्यात घेतले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात आणण्यात आला होता.दरम्यान किमया देशमुख ही औरंगाबाद येथील असून ती काही दिवसांपूर्वी आपल्या आजोबाकडे आली होती. किमयाचे आई व वडील डाॅक्टर असल्याचे सांगितले जात आहे.

बीडमधील खड्डे आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांचा नाहक जीव जात आहे. नगरपालिका, सार्वजनिक बांधकाम विभाग, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्याकडे अनेक वेळा तक्रारी करुनही काहीच उपयोग होताना दिसत नाही.

 

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Beed Live Updates Nine Years Girl Died In Accident Marathi News